ओझर विद्यामंदिरचे हिरकमहोत्सवानिमित्त आयोजन
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित, ओझर विद्यामंदिर कांदळगाव या प्रशालेच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या भावगीत व भक्ती गीत गायन स्पर्धेत भाविक मेस्त्री आणि आर्या आचरेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सदर स्पर्धा सौ. उमदी परब(सरपंच कांदळगाव) आणि श्री. आनंद आयकर (उपसरपंच कांदळगाव) यांनी प्रायोजित केली होती. भावगीत/भक्तिगीत गायन स्पर्धा इयत्ता ५ वी ते ७ वी व इयत्ता ८ वी ते १० वी या दोन गटांमध्ये झाली. या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून स्पर्धकांनी उदंड प्रतिसाद दिला. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- (इयत्ता ५वी ते ७वीच्या गटामध्ये) प्रथम क्रमांक- भाविक मेस्त्री(जिल्हा परिषद शाळा तेंडोली नं.1), द्वितीय- स्वरा आचरेकर(न्यू इंग्लिश स्कूल आचरा), तृतीय – कुमार तेंडुलकर (दत्ता सामंत स्कूल, देवबाग)यांनी. तर (इयत्ता ८वी ते १०वीच्या गटामध्ये) प्रथम- आर्या आचरेकर(न्यू इंग्लिश स्कूल आचरा), द्वितीय- स्वरूप वळंजू(अ.शि .दे. टोपीवाला हायस्कूल मालवण), तृतीय- अवधूत पारकर(ओझर विद्यामंदिर कांदळगाव) यांनी यश संपादन केले .
स्पर्धेचे उद्घाटन हडी गावचे सरपंच व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य श्री. महेश मांजरेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. या प्रसंगी व्यासपीठावर कांदळगावच्या सरपंच सौ. उमदी परब, संस्थेचे पदाधिकारी व मालवण तालुका माजी सभापती उदय परब, मुख्याध्यापक पी.आर. खोत, मालवण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष गावडे, विशाल राणे विराजमान झाले होते. आपल्या मनोगतामध्ये कांदळगावच्या सरपंच सौ उमदी परब यांनी प्रशालेच्या उपक्रमांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे जाहीर केले तर उद्घाटक हडी गावचे सरपंच महेश मांजरेकर यांनी कलावंत घडविण्यासाठी अशा स्पर्धांची, उपक्रमांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. तर संस्थाचालक उदय परब यांनी संस्थेच्या पुढील ध्येयधोरणांची रूपरेषा मांडून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेच्या निमित्ताने प्रशालेचे सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक, माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संगीतातील दर्दी रसिक बहुसंख्येने उपस्थित होते. संगीत साथ आदर्श संगीत विद्यालय मालवणचे गुरुवर्य मंगेश कदम, विजय बोवलेकर, वैभव मांजरेकर, विरेश वळंजू यांनी दिली. परीक्षक म्हणून कुडाळ येथील संगीतज्ज्ञ श्री. श्याम तेंडोलकर यांनी काम पाहिले. संपूर्ण स्पर्धेचे व्हिडिओ शूटिंग माजी विद्यार्थी ओमकार परब यांनी केले. कार्यक्रमाचे व स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री. प्रवीण पारकर यांनी केले. तर आभार श्री. पी.के. राणे यांनी मानले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एस. परब, शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे व मुख्याध्यापक प्रतापराव खोत यांनी स्पर्धेतील सर्व सहभागी व यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे.
दोन्ही विजेत्यांचे मन:पुर्वक अभिनंदन.