बांदा | प्रतिनिधी : मडुरा डीगवाडी येथे बेकायदा खनिज वाहतूक संतप्त ग्रामस्थांनी रोखली. याबाबत सावंतवाडी तहसीलदार, मडुरा तलाठी यांना माहिती देण्यात आली. सावंतवाडी तहसीलदार यांच्या आदेशाने दुपारी सदर डंपर सावंतवाडी तहसील कार्यालयात नेण्यात आला. मडुरा तलाठी एन. आर. नाईक व पाडलोस तलाठी सुप्रिया शेळके यांनी ही कारवाई केली. बांदा – शेर्ले – मडुरा डोंकल रस्ता साईडपट्टी मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, संबंधित ठेकेदारांकडून निकृष्ट काम सुरू असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. ६ इंच खोदकाम करणे गरजेचे असताना २ इंच सुद्धा खोदकाम केले नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. रस्ता साईडपट्टी मजबुती करणाच्या नावावर सुरू असलेल्या कामामुळे मुळात सुरक्षित असलेली साईडपट्टी आता अधिकच धोकादायक बनली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कामाची पाहणी करीत नसल्याचाही ग्रामस्थांचा आरोप आहे. याकामासाठी बेकायदा खनिज वाहतूक केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. यासाठी आवश्यक परवाना आपल्याकडे नसल्याचे डंपर चालकाने सांगितले.
यावेळी रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, पाडलोस उपसरपंच राजू शेटकर, प्रकाश वालावलकर, माजी उपसरपंच विजय वालावलकर, मंदार वालावलकर, दत्ताराम परब, संकेश मडुरकर आदींसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.