मालवण | प्रतिनिधी : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. मोबाईलच्या माध्यमातून नकळत होणाऱ्या या चुका आपल्या जीवनात ताण- तणाव निर्माण करतात व पुढे जाऊन आपले आयुष्य उध्वस्त करतात. त्यामुळे मोबाईलचा वापर करताना किती सावधगिरी बाळगली पाहिजे याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून करण्यात आलेली ‘सायबर भान’ ही एक चळवळ असून त्यासाठी अभिप्रेत असणारा समाज घडवूया असे आवाहन व्याख्याते मंदार वैद्य यांनी कट्टा येथील वराडकर हायस्कूल येथे बोलताना केले.
कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे सायबर भान हा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापुर येथील व्याख्याते श्री. मंदार वैद्य यांनी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (संयुक्त) कट्टा, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल, डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्ट्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष सुधीर वराडकर, सचिव विजयश्री देसाई, सचिव सुनील नाईक, माजी मुख्याध्यापक अनिल फणसेकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, वराडकर इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक ऋषी नाईक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र मिराशी आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे यांनी स्वागत केले.
यावेळी श्री. मंदार वैद्य यांनी मुलांना बोलते करून विद्यार्थ्यांच्या दैनंदिन व्यवहारातील वैयक्तिक मोबाईल वापराची माहिती काढून घेतली व त्यामधील धोके सांगताना प्रश्नोत्तराच्या शैली मधून विद्यार्थ्यांना प्रवृत्त करताना एखादी चुकीची गोष्ट मांडण्याचे धाडस निर्माण केले. आपली होणारी चूक ही चूक आहे का? याचे ही भान नसणाऱ्या मुलांना मोबाईलच्या वापराचा योग्य मार्ग वैद्य यांनी सांगितला. तर सुरेश वैद्य यांनी मोबाईलच्या अतिवापरा संदर्भात व्हिडिओ, एडिटिंग मार्क म्हणजे दुसऱ्याचा चेहरा वापरून करण्यात येणारे कृती, मोबाईलचे अंधकारमय जग म्हणजे व त्यातील होणाऱ्या चुका पुढे त्यातून निर्माण होणारे गुन्हे तसेच या माध्यमातून होणारे अल्पवयीन बाल गुन्हेगार , युवा गुन्हेगार व आता होऊ घातलेले गुन्हे या विषयी माहिती देत असताना मोबाईल पासून
दूर राहून गरजेचे असणाऱ्या बाबीव्यतिरिक मोबाईलचा अतिवापर व सायबर गुन्ह्याबाबतीत कोणत्या प्रकारे सावधगिरी बाळगावी याबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी अजयराज वराडकर यांनी आपले भविष्य उज्वल असून इथून पुढे घडणाऱ्या पिढ्या या सुसंस्कृत झाल्या पाहिजे यासाठी आज जगातील बऱ्याच धोक्यापासून आपण सावध राहिले पाहिजेत यामधील महत्त्वाचा धोका मोबाईल पासून असून वेळीच आपण सावध होऊया असे सांगितले.