एकूण १५० किलो प्लास्टीक जप्त आणि २१ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल.
मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषदेच्या वतीने शहरात विविध व्यावसायिक ठिकाणी प्लास्टीक जप्तीची कारवाई करण्यात आली. नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज १० डिसेंबर २०२४ रोजी नगरपरीषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत एकूण १५० किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले असून एकूण २१ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने दिनांक १ जुलै २०२२ पासून ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या सिंगल युज प्लॅस्टिक पिशवी उत्पादन, आयात, साठवण, विक्री व वापरावर बंदी केलेली आहे. महाराष्ट्र प्लॅस्टिक आणि थर्मोकोल अधिसूचना २०१८ नुसार याबाबत दोषी आढळल्यास ५०० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश आहेत.
मालवण नगरपरिषद प्रशासनाद्वारे वेळोवेळी ५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक वापराबाबत सोशल मिडिया, वृत्तपत्रे तसेच विविध माध्यमातून जागृती केली जात आहे. आगामी काळात देखिल अशा कारवाई सुरु राहतील अशी माहिती मालवण नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.