मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील बांदिवडे बुद्रुक खोरवाडी, कासलेवाडी, पवारवाडी, आईर वाडी व खालचा वाडा येथील ग्रामस्थांनी एकत्र येवून पूर्ण केलेल्या गणेशघाट आणि बांदिवडे शाळा क्र. १ पालयेवाडी गणपती विसर्जन स्थळा पर्यंत नदीवर जाणाऱ्या रस्त्याचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. गणेश घाट आणि घाटापर्यन्त जाणारी जमीन संबंधीत जमिन मालकांनी विना मोबदला दिली. या परिसरातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन मातीचा रस्ता ५०० मीटरपेक्षा जास्त लांबीचा बनवला आहे. लोकवर्गणीतून आतापर्यन्त जवळपास रु.३,३२,६४२/ एवढा खर्च झालेला आहे.
गणेश घाट मार्गाचे रुंदीकरण व गणेश घाट बांधणे ही संकल्पना खोरवाडीचे ग्रामस्थ श्री सोनू सुधाकर सावंत यांनी मांडली. सतत दोन वर्ष यासाठी पाठपुरावा चालू होता. श्री चंद्रकांत हरिश्चंद्र परब, श्री. अप्पा दिनकर परब, विश्वनाथ परब, शामसुंदर प्रभू, श्री. मधू परब यांच्या सह सर्व ग्रामस्थांचे मार्गदर्शन व सहकार्याने काम पूर्ण झाले. उदघाट्न प्रसंगी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.