आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्यामुळेच त्याला विक्रमादित्य या नावानेही ओळखले जाते. सध्याच्या घडीला विराट कोहली त्याच्या विक्रमाचा वेगाने पाठलाग करताना दिसतोय. अनेकदा सचिन-विराट यांच्यात तुलनाही केली जाते. सचिन तेंडुलकरचा एखादा विक्रम कोण मागे टाकेल? हा प्रश्न विचारला तर पहिलं नाव कदाचित विराटच येते. पण रिकी पाँटिंगला तसं वाटत नाही.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कसोटीतील सर्वाधिक धावांच्या रेकॉर्डसंदर्भात मोठं वक्तव्य केले आहे. इंग्लंडचा स्टार बॅटर जो रूट याबाबतीत आघाडीवर जाईल, अशी भविष्यवाणी रिकी पाँटिंगनं केली आहे. इंग्लंडचा बॅटर जो रूट हा धावांसाठी भूकेला असणारा क्रिकेटर आहे. पुढील काही वर्षे त्याने सातत्य टिकवून ठेवले तर मास्टर ब्लास्टरचा कसोटीतील सर्वाधिक धावांचा विक्रम मागे पडेल, असे पाँटिंगनं म्हटले आहे.
वर्षाची आकडेवारी सांगत पाँटिंगनं केला भविष्यातील टेस्ट किंगसंदर्भातील दावाआयसीसी रिव्ह्यूमध्ये पाँटिंग म्हणाला आहे की, “रूटमध्ये हा विक्रम मोडण्याची क्षमता आहे. तो आता ३३ वर्षांचा आहे. नवा विक्रम सेट करण्याची त्याच्याकडे संधी आहे. तो किती वर्षांपर्यंत खेळणार ते पाहावे लागेल. वर्षाला १० ते १४ कसोटीसह तो ८०० ते १००० धावा सहज काढतो. याच सातत्याने तो कामगिरी करत राहिला तर तीन चार वर्षांत तो कुठे पोहचेल विचार करा.”कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रुट सध्या सातव्या क्रमांकावर आहे. या यादीत इंग्लंडचा एलिस्टर कूक १२४७२ धावांसह त्याच्या पुढे आहे.