कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत 1454 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. नफ्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 116 टक्के वाढ झाली आहे.
मुंबई : देशातील शेअर बाजार शुक्रवारी 2 ऑगस्ट रोजी कोसळले आहेत. मात्र, या मोठ्या पडझडीतही अदानी समूहाची कंपनी अदानी विल्मर लिमिटेडच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अदानी विल्मरचे शेअर्स 5 टक्क्यांहून अधिक वाढून 370.75 रुपयांवर पोहोचले. गुरुवारी कंपनीचा शेअर 348.20 रुपयांवर बंद झाला होता. अदानी विल्मारच्या शेअर्समध्ये ही वाढ मोठ्या घोषणेनंतर झाली आहे. अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड ने गुरुवारी कंपनीच्या फूड-एफएमसीजी व्यवसायाचे डिमर्जर आणि अदानी विल्मरसोबत सामील करण्यास मान्यता दिली.
अदानी एंटरप्रायझेसची 43.94 टक्के हिस्सेदारी
अदानी एंटरप्रायजेस लिमिटेडकडे अदानी विल्मारमध्ये 43.94 टक्के हिस्सा आहे. अदानी एंटरप्रायझेसने अदानी कमाॅडिटीजच्या माध्यमातून अदानी विल्मारमध्ये हे भागभांडवल आहे. डिमर्जरनंत अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडच्या भागधारकांना अदानी एंटरप्रायझेसच्या प्रत्येक 500 शेअर्समागे अदानी विल्मरचे 251 शेअर्स मिळतील किंवा गुंतवणूकदारांना त्याच प्रमाणात शेअर्स मिळतील. डिमर्जर योजनेमध्ये अदानी कमाॅडिटीजमधील अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडच्या धोरणात्मक गुंतवणुकीचाही समावेश आहे.
अदानी एंटरप्रायझेसच्या नफ्यात वाढ
अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत 1454 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या नफ्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 116 टक्के वाढ झाली आहे. अदानी एंटरप्रायझेसने वर्षभरापूर्वी याच कालावधीत 674 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 12 टक्के वाढून 25472 कोटी रुपये झाला आहे.
शेअर्स एका वर्षात 8 टक्के घसरले
अदानी विल्मरचे शेअर्स गेल्या एका वर्षात 8 टक्के घसरले आहेत. कंपनीचे शेअर्स 2 ऑगस्ट 2023 रोजी 400.40 रुपयांवर होते. तर 2 ऑगस्ट 2024 रोजी शेअर्स 370.75 रुपयांवर व्यवहार करत आहेत. अदानी विल्मर शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 414.45 रुपये आहे. त्याच वेळी 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 285.85 रुपये आहे.