बांदा | राकेश परब : बांदा-शिरोडा व रोणापाल-सातार्डा मार्गावरील मडुरा तिठा येथे अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविणे गरजेचे आहे. अनेक अपघात घडूनही सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येत नसल्याने भाजपा सातार्डा शक्ती केंद्रप्रमुख यशवंत माधव यांनी मडुरा तिठा येथे चारही बाजूने गतिरोधक उभारण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. सदर मागणीचा सकारात्मक विचार करुन तात्काळ कार्यवाही करू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याचे श्री. माधव यांनी सांगितले.
बांदा-शिरोडा मार्गावर मडुरा तिठा येथे तसेच बांदा, निगुडे, रोणापाल, मडुरा, सातार्डा, किनळे मार्गावर मडुरा येथे दोन्ही बाजूने गतिरोधक बसविणे आवश्यक आहे. याठिकाणी चौकात वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याचे प्रकार वाढले आहे. वारंवार मागणी करूनही बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी आपली कैफियत यशवंत माधव यांच्याकडे मांडली.
दरम्यान, मडुरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक समोर धोकादायक वळणावर दोन्ही बाजूंनी गतिरोधक बसवावे. कारण चार दिवसांपूर्वीच येथे अपघात होऊन एकजण जखमी झाला होता. तसेच शाळेतील लहान मुले धावत रस्त्याच्या दुतर्फा फिरत असतात. अशावेळी गंभीर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही याची दखल अधिकाऱ्यांनी घ्यावी व तात्काळ गतिरोधक बसवावे, अशी मागणी सातार्डा शक्ती केंद्रप्रमुख यशवंत ऊर्फ तात्या माधव यांनी केली.