सर्व सभासदांना एकत्र घेऊन काम करणार असल्याची उद्योजक डाॅ. दिपक परब यांची प्रतिक्रिया.
मसुरे | प्रतिनिधी : राज्याच्या व्यापार उद्योगाची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चरच्या द्वैवार्षिक निवडणुकीची संपूर्ण राज्यातील मतमोजणी नुकतीच मुंबई येथे पूर्ण झाली. त्यात विद्यमान अध्यक्ष श्री ललित गांधी आणि ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेडणेकर यांच्या नेतृत्वाखालील शेठ वालचंद हिराचंद प्रगती पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व मिळविले. विद्यमान अध्यक्ष ललित गांधी यांची पुनश्च अध्यक्ष आणि मसुरे गावचे सुपुत्र डॉक्टर दीपक परब यांची कोकण विभाग उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली..
कोकण विभागाच्या उपाध्यक्षपदी मसुरे गावचे सुपुत्र डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांची बिनविरोध निवड झाली या बद्दल बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या कोकण विभाग उपाध्यक्षपदी माझी बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्वप्रथम या चेंबरच्या सर्व सभासदांचे आणि ही निवड बिनविरोध होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचा मी ऋणी आहे. मिळालेल्या संधीतून महाराष्ट्र चेंबरची मान नेहमीच उंच करण्याचा प्रयत्न करेन तसेच सर्व सभासदांना सोबत घेऊन यापुढे कार्य करत राहीन.
श्री. दीपक परब यांच्या निवडी नंतर त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन आणि प्रशंसा होत आहे.