सिंधुदुर्गनगरी | ब्युरो न्यूज : निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांना निवृत्तीवेतन, सुधारित निवृत्ती वेतन, कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर लाभ, कोषागारामार्फत प्रदान करण्यात येतात. असे संबंधित सर्व लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुलीबाबत किंवा प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोषागार कार्यालयामार्फत फोन करून संपर्क साधला जात नाही किंवा ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सूचित केले जात नाही. कोषागार कार्यालयामार्फत फक्त लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केला जातो.
याबाबत काही निवृत्ती वेतनधारकांना फोन करून ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोषागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जाते आहे. याबाबतच्या तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. अशा कोणत्याही प्रकारचा फोन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत केला जात नाही किंवा कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतन धारकांच्या घरी पाठविले जात नाही असे कोषागारा मार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्व निवृत्तीवेतनधारक व कार्यरत कर्मचारी यांना आवाहन करण्यात आले आहे की, आपणांस दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवरून वरील बाबींच्या संदर्भात संपर्क साधून रक्कम ऑनलाईन, गुगल पे, फोन पे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भरण्याबाबत जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत कळविले जात नाही. कोणीही अशा प्रकारच्या दूरध्वनी संदेशाला प्रतिसाद देऊ नये. याबाबत निवृत्ती वेतन धारकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती संबंधित निवृत्ती वेतन धारकाची वैयक्तिक जबाबदारी राहील असे विशेष नमूद केले आहे. तसेच अशा प्रकारच्या दूरध्वनी प्राप्त झाल्यास कृपया कोषागार कार्यालयाला याची कल्पना द्यावी आणि कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथमतः कोषागार कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी व अपर कोषागार अधिकारी ( निवृत्तीवेतन) यांच्याकडून करण्यात आले आहे.