काही अधिकार्यांच्या संथ कार्यपद्धतीमुळे मतदानाची वेळ संपली तरी मतदान ठेवावे लागले सुरु..!
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या देऊळवाडा शाळा बुथ क्र. ९३ या मतदान केंद्रावर उपस्थित काही अधिकारी यांच्या संथ कारभाराने मतदान संथ गतीने होत होते. यामुळे मतदार तासंतास रांगेत उभे होते. वरिष्ठ अधिकारी यांना सांगूनही याबाबत कार्यवाही होत नसल्याने स्थानिक नागरिक व राजकीय पदाधिकारी यांनी नाराजी व संताप व्यक्त केला. शेवटी आणखी एका अधिकारी यांची मतदान केंद्रावर नियुक्ती करून मतदान प्रक्रिया सूरू करण्यात आली. मतदानाची वेळ संपली तरी सायंकाळी उशिरा पर्यंत पोलीस बंदोबस्तात मतदान सूरू होते. मतदानाची वेळ संपली तरी मतदान केंद्रावर मतदारांची भली मोठी रांग होती. शेकडो मतदार रांगेतच उभे होते. यावेळी पोलीस अधिकारी व टीम तिथे दाखल झाले. सहा वाजेपर्यत मतदान केंद्रावर आलेल्या सर्वाना नंबर कुपन देण्यात आली. मतदान प्रक्रियेतील संथ कारभार असलेल्या अधिकारी यांना आणखी एक अधिकारी मदतनीस स्वरूपात जबाबदारी देण्यात आली. अधिक गतिमान पद्धतीने मतदान प्रक्रिया सूरू करण्यात आली. मतदान करणाऱ्यां व्यतिरिक्त त्या ठिकाणी जमलेल्या नागरिक व राजकीय पदाधिकारी यांना बाजूला जाण्याचे आवाहन करण्यात आले. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त अधिक तैनात ठेवण्यात आला. सायंकाळी उशिरा पर्यंत मतदान प्रक्रिया सूरू होती.
मालवण शहरात देऊळवाडा शाळा या ठिकाणी मतदार अशा प्रकारे दोन दोन तास रांगेत उभे राहण्याचा हा मतदान केंद्रावरील पहिलाच प्रकार आहे. प्रशासन अधिकारी यांना सांगूनही तसेच तालुका वरिष्ठ अधिकारी यांनीही कोणतीही दखल न घेतल्याने नागरिकांचा संताप वाढला. उशिरापर्यत जे मतदान सुरू होते त्याला प्रशासन जबाबदार आहे अशी नाराजीची प्रतिक्रिया माजी नगरसेवक दीपक पाटकर, विजय केनवडेकर यांसह राजकीय पदाधिकारी यांनी व्यक्त केली.
मतदानासारख्या पवित्र अधिकाराची प्रक्रिया दिलेल्या वेळेत काटेकोरपणे हाताळून पूर्ण करणे ही प्रशासनाची जबाबदारी वेळेत पूर्ण न झाल्याने ‘समय समाप्तीची घोषणा परंतु…..’ अशी स्थिती मात्र निर्माण झाली.