मसुरे | प्रतिनिधी : मानवता विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेत निवेदन पत्र दिले. या निवेदनात सुरवातीला त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या कामाची प्रशंसा करुन कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य अशी मानवता विकास परिषद या संस्थेचा भारतीय जनता पक्षाचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नारायण राणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिले असल्याचेही नमूद केले आहे.
यावेळी भविष्यातील कोकणच्या सर्वांगीण विकासाचे निवेदन देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून नारायण राणे हेच हा विकास करू शकतील असा विश्वास श्रीकांत सावंत यांनी व्यक्त केला आहे. तसेच निवेदनात, दुबई सिंगापूर मलेशिया यासारख्या विकसित देशांमधील व्हिजन घेऊन कोकणातही तशाच पद्धतीने रोजगाराच्या आणि पर्यटनाच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात यासाठी केंद्र सरकारकडून भविष्यात भरीव असा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे, कोकणात होऊ घातलेले सी वर्ल्ड प्रकल्प सावंतवाडी रेल्वे टर्मिनस प्रश्न विमान सेवा, वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्ग कोकण रेल्वे दुपदरीकरण गोवा महामार्ग त्वरित पूर्ण करणे, कोकणपट्टीतील अनेक बंदरे विकसित करणे समुद्र मार्गे जलवाहतूक पूर्वीप्रमाणे सुरू करणे, बोट वाहतूक सेवा पुन्हा नव्याने सुरू करणे, कोकणचा सृष्टी सौंदर्य काश्मीर प्रमाणे असून ते वाढविण्यासाठी प्रशासनाकडून योग्य नियोजन करणे, मच्छीमारांसाठी भरीव योगदान देणे, शेतकऱ्यांच्या विविध मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे, वैद्यकीय शिक्षण मराठी मातृभाषेतून करणे, राज्याचे विभाजन न करणे, महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई ही महाराष्ट्रातच राहिली पाहिजे अशा पद्धतीने कोकणच्या भरीव अशा अनेक प्रश्नांबाबत श्रीकांत सावंत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे लक्ष वेधले आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कोकणच्या राहिलेले विविध विकासात्मक आणि पर्यटनात्मक प्रश्न सोडवण्याची क्षमता ही नारायण राणे यांच्यात असून मानवता विकास परिषद ही संस्था यावेळी संपूर्णपणे नारायण राणे यांच्या पाठीशी राहणार असल्याचे मत संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी व्यक्त केले आहे.