मसुरे | प्रतिनिधी : मुंबईचे माजी महापौर माजी आमदार डाॅ. रमेश यशवंत प्रभू यांनी १९९७ साली प्रबोधकार ठाकरे क्रीडा संकुलाची स्थापना केली तेव्हा त्यांच्या मनात एक मोठे स्वप्न होते. त्यांना जागतिक दर्जाच्या आणि सर्वांसाठी खुल्या अशा पायाभूत सुविधा निर्माण करायच्या होत्या. या संकुलाच्या जिम्नॅस्टिक्स ॲथलीट आध्यान देसाईची आगामी ज्युनियर एशियन ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप २०२४ साठी हाँगकाँग, चीन येथे टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.
ही स्पर्धा मे महिन्यात होणार असून १० ते १२ मे २०२४ या कालावधीत होणार आहे. आध्यान हा माजी अंडर – १२ राष्ट्रीय चॅम्पियन देखील आहे आणि त्याने कोलकाता येथे नुकत्याच संपलेल्या सब ज्युनियर नॅशनल स्पर्धेत अनेक पदकेही जिंकली आहेत. हरियाणा येथील खेलो इंडियन युथ गेम्स २०२२ मध्येही त्याने भाग घेतला होता आणि सरकारी मंजूर योजनेअंतर्गत तो एक खेलो इंडिया ॲथलीट आहे. आध्यान गेल्या १० वर्षांपासून प्रबोधकार ठाकरे क्रीडा संकुल मध्ये सराव करत आहे. त्यांचे प्रशिक्षक श्री शुभम गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्ष श्री. अरविंद रमेश प्रभू आणि सचिव श्री मोहन अ. राणे यांच्या पाठिंब्याने त्याने ही कामगिरी केली आहे.
अध्यक्ष श्री. अरविंद रमेश प्रभू आणि सचिव मोहन अ. राणे यांनी अभिनंदन करत आशियाई स्पर्धेसाठी आध्यानला शुभेच्छा दिल्या.