खारेपाटण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या शेर्पे मुस्लिम वाडीत २२ एप्रिलला चोरीची घटना घडली होती. चोरट्यांनी बंद घरांत छप्पर व भिंतीच्या फटीतून रोख रुपये ८ हजार ५०० लांबवले होते. या चोरीची तक्रार दाखल होताच कणकवली पोलिस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद देठे, खारेपाटण पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस नाईक उद्धव साबळे, काॅन्स्टेबल मोहीते, यांच्या पथकाने तत्परतेने लगतच्या परिसरात सूत्रे हलवली. तपासात संशयित म्हणून धीरज यशवंत जाधव व राकेश यशवंत जाधव यांच्याकडे संशयाची सुई गेल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक शरद देठे यांच्यासह पोलिस नाईक उद्धव साबळे व काॅन्स्टेबल मोहीते यांनी आरोपींना खारेपाटण तळेरे हद्दित जेरबंद करत त्यांच्या कडून रोख रुपये ८ हजार ५०० जप्त केले. या कामात शेर्पे पोलिस पाटील विनोद शेलार, बेर्ले पोलिस पाटील रतन राऊत यांनिही सतर्कतेने सहकार्य केले.
या प्रकरणातील जलद तपासाबद्दल पोलिस निरीक्षक समशेर तडवी यांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. जेरबंद केलेल्या संशयित चोरट्यांनी आणखीन घरफोडी अथवा चोरी केली आहे का याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शरद देठे करत आहेत.