तळेरे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या
तळेरे येथील प्रज्ञांगण आयोजित करिअरच्या वाटेवर या निवासी कार्यशाळेत विविध मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. अनिल नेरुरकर, पत्रकार शेखर सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराचे अध्यक्ष उदय दुधवडकर, आयोजक सतीश मदभावे, सौ. श्रावणी मदभावे, संग्राहक निकेत पावसकर, राजापूर अर्बन बँक तळेरे शाखेचे शाखा व्यवस्थापक दुर्गेश बिर्जे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळासाठी तब्बल ७६ मुला व मुलींनी सहभाग घेतला होता. यामध्ये कुडाळ, कणकवली, मालवण तालुक्यातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून सकाळच्या सत्रात पत्रकार शेखर सामंत यांनी ‘झिरो से हिरो तक’ या विषयावर आपल्या आयुष्यातील जीवनक्रम मुलांसमोर उलगडला. यानंतर डॉ. अनिल नेरुरकर यांनी विद्यार्थ्यांना ‘इंग्लिश कम्युनिकेशन स्किल’ आणि त्यातील महत्त्व यावरती मार्गदर्शन केले.
दुपार सत्रामध्ये मानसोपचार तज्ञ श्रीमती मंजिरी घेवारी यांनी विद्यार्थ्यांना ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’ या विषयावर उत्साह पूर्ण मार्गदर्शन केले. पोंभुर्ले गावचे सुपुत्र आणि गुरुकुल करिअर अकॅडमीचे प्राध्यापक अजित जांभेकर यांनी ‘स्पर्धा परीक्षा आणि कोकणातील तरूणांची आवश्यक मानसिकता’ या विषयावर मार्गदर्शन केले.
सायंकाळच्या सत्रात चित्रकार उदय दुधवडकर यांनी विद्यार्थ्यांना ‘कार्टून आर्ट’ या विषयावरती मनोरंजनात्मक मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. अनिल नेरुरकर यांनी ‘यश गाठुया मोठे होऊया’ तसेच ‘बोलेल तोच जिंकेल’ या विषयावर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. शेवटच्या सत्रात माजी आमदार प्रमोद जठार यांनी विद्यार्थ्यांसोबत गप्पा टप्पा या विषयाला हात घालत दिवसभरात झालेल्या प्रत्येक सेशन बद्दल विद्यार्थ्यांची हितगुज साधले आणि विद्यार्थ्यांना यशस्वितेसाठी आवश्यक मूलमंत्र देऊन विद्यार्थ्यांचा निरोप घेतला. यावेळी ते म्हणाले की, पुस्तकासारखा जिवलग मित्र आणि मार्गदर्शक कोणीही नाही. पुस्तकेच तुम्हाला शिकवतील, पुस्तकेच मार्गदर्शन करतील. यासाठी प्रत्येकाने वाचनालयात गेले पाहिजे आणि प्रचंड वाचन केले पाहिजे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध संदेश पत्र संग्राहक आणि नाणी संग्राहक निकेत पावसकर यांच्याकडून त्यांच्या जीवनात त्यांनी जोपासलेल्या छंदाबद्दल जाणून घेतले तसेच त्यांच्याकडील दुर्मिळ ऐतिहासिक नाणींचा संग्रह देखील प्रत्यक्ष हाताळून अनुभवला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली मांजरेकर, सतीश मदभावे, श्रावणी मदभावे यांनी केले.