शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या शिरगांव, साळशी, चाफेड, कुवळे परिसरातील जंगलात सध्या गवा रेड्याच्या कळपांचा वावर मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. शिरगांव – चौकेवाडी फाट्या नजीकच्या वळणावर एका मोठ्या गवा रेड्याने बाबल्या गणपत पवार या दुचाकीस्वारावर अचानक हल्ला केला. यात त्यांच्या डोक्याला तसेच उजव्या बाजूला हाता पायांनाही दुखापत झाली असून ते कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ही घटना गुरुवारी २८ मार्च रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.

अपघातात दुचाकीचेही नुकसान.
गुरुवारी संध्याकाळी बाबल्या गणपत पवार हे काही कामानिमित्त मोटासायकलने शिरगांवला गेले होते. ते ८ :३० वाजता आपल्या घरी साळशीला परतत असताना चौकेवाडी फाट्या नाजिकच्या वळणावर अचानक गवा रेड्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या डोक्याला तसेच उजव्या बाजूला हाता पायांनाही दुखापत झाल्याने त्यांना सत्यवान पवार यांनी शिरगांव येथील खाजगी दवाखान्यात त्यानंतर त्यांना शिरगांव प्राथमिक आरोग्यकेंद्रात नेण्यात आले. डोक्याला इजा झाल्याने सध्या ते कणकवली येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत.
दरम्यान ही घटना घडल्यानंतर परिमंडळ वनधिकारी अधिकारी सारीक फकीर, वनरक्षक रामदास घुगे यांनी पाहणी केली. सध्या साळशी, चाफेड, कुवळे, आयनल आदी गावातील जंगलात गवा रेद्यांचा मोठा कळप फिरत असून अनेक शेतकऱ्यांच्या बागांचे, वायंगणी शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहेत. काही भागात तर दिवसाढवळ्या हे गवा रेडे पाहायला मिळतात. अनेक वाहनचालकांना रस्त्यावर उभे असलेले पाहायला मिळतात. रात्री वाहनचालकांना आपली वाहने चालवताना अक्षरशः जीव मुठीत धरून चालवावी लागतात. सद्या काजू – आंबा हंगाम चालू असल्यामुळे बागायदार व शेतकऱ्यांना आपल्या बागेत एकट्याने जायची प्रचंड भीती निर्माण झाली आहे. तरी संबंधित वनविभागाने याकडे तत्काळ लक्ष द्यावे अशी जोरदार मागणी होत आहे.