मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण येथील युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रितम गावडे यांनी मनसे मालवण तालुकाध्यक्ष पदाचा, ३ मार्चला रविवारी राजीनामा दिला. दरम्यान उद्योजक तथा युवा नेते सतीश आचरेकर यांच्या पुढाकारातून प्रितम गावडे यांनी अनेक सहकाऱ्यांसह शिवसेना रत्नागिरी सिंधुदुर्ग नेते किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांची रत्नागिरी येथे भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी, विकासकामे यासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी युती सरकारच्या माध्यमातून सहकार्य मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील व सोबत असल्याचा विश्वास यावेळी किरण सामंत यांनी व्यक्त केला. शिवसेना नेते तथा उद्योजक भैयाशेठ सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश आचरेकर यांच्या सोबतीने आपण जनसेवेसाठी कार्यरत राहणार आहे असे प्रितम गावडे यांनी यावेळी सांगितले.
सन्माननीय किरण सामंत यांना दिवसभर विविध भागातून अनेकजण भेट घेण्यासाठी येत असतात. किरण सामंत ज्या पद्धतीने सर्वांचे ऐकून घेत प्रश्न सोडवतात आणि सर्वांना न्याय देतात ते खरोखरच कौतुकास्पद व आदर्शवत असेच आहे अशा भावना प्रितम गावडे यांनी व्यक्त केल्या.