मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून श्री शिवाजी वाचन मंदिर, मालवण आयोजीत ‘काव्यसंध्या” कार्यक्रमात कवी रुजारीओ पिंटो, सुनंदा कांबळे आणि कमलेश गोसावी यांच्या कवितांना मालवणवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात २७ फेब्रुवारीला सायंकाळी राज्यभाषा दिनाचे औचित्य साधून काव्यसंध्या हा कार्यक्रम संपन्न झाला. शहरातील श्री दत्त मंदिर, भरड यांच्या पटांगणातील मंचावर हा कार्यक्रम रंगला. मालवणचे सुप्रसिद्ध उद्योजक व कवी श्री. रुजारीओ पिंटो, कवयित्री तथा कोकणच्या बहिणाबाई नांवाने गौरविल्या जाणार्या विजयदुर्गच्या कवयित्री सुनंदा कांबळे आणि काळसे येथील (कणकवली येथील अध्यापक) शैलिदार कवी श्री. कमलेश गोसावी यांच्या कवितांच्या सादरीकरणाला मालवण वासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
श्री देवी शारदेला वंदन करुन व पुष्पमाला अर्पण करुन मंचावर उपस्थित मान्यवर आणि कवींच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. श्री. शिवाजी वाचन मंदिर, मालवणचे उपाध्यक्ष डाॅ. सुभाष दिघे यांनी उपस्थित मान्यवर व सर्वांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. यानंतर कवी कमलेश गोसावी, कवयित्री सुनंदा कांबळे आणि रुजारीओ पिंटो या निमंत्रीत ‘काव्य त्रिकुटाने’ कार्यक्रमात त्यांच्या कविता सादर केल्या.
कमलेश गोसावी यांच्या ‘मी सिंधुदुर्ग… मालवण हून बोलतोय’, रुजारीओ पिंटो यांच्या ‘कोकण रडता,’ आणि सुनंदा कांबळे यांच्या ‘रामायणाच्या नाटकाची गजाल’ आणि तिनही कवींच्या अन्य सर्व कवितांना रसिकांची दाद मिळाली. मंचावरील तिन्ही कवींनी त्यांच्या काव्यप्रवासाची सुरवात कशी झाली याबद्दल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अक्षय सातार्डेकर यांनी केले आणि श्री शिवाजी वाचन मंदिरच्या कार्यध्यक्ष सौ. वैदेही जुवाटकर यांनी उपस्थित मान्यवर व प्रेक्षक यांचे आभार मानले.
या कार्यक्रमात उद्योजक व कवी रुजारीओ पिंटो यांच्या आज २७ फेब्रुवारीला, वाढदिवसानिमित्त कवयित्री सुनंदा कांबळे यांनी विशेष काव्य शुभेच्छा पत्र दिले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित पर्यटन व्यावसायिक बबन शेलटकर आणि नगरवाचन मंदिर मालवण यांचे ग्रंथपाल व सुप्रसिद्ध सूत्रसंचालक श्री. संजय शिंदे यांना त्यांच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला आयोजक श्री शिवाजी वाचन मंदिर मालवण यांच्या कर्मचारी शांभवी कोळगे, भाजपा मच्छिमार सेलचे समन्वयक रविकिरण तोरसकर, कवयित्री सुनंदा कांबळे यांचे यजमान श्री कांबळे, डिजीटल उद्योजक अजय मुणगेकर व मालवणच्या सर्व क्षेत्रातील रसिक उपस्थित होते.