शिरगांव | संतोष साळसकर : कोकण भूमी ही पर्यटनदृष्ट्या जगाच्या नकाशावर प्रसिद्ध आहे. याच कोकणभूमीतील पुरातनकालीन गड किल्ल्यांचे संशोधन आणि संवर्धन झाल्यास ऐतिहासिक ठेवा आजच्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल. या गड किल्ल्यांचे जतन आणि संशोधन होणे काळाची खरी गरज आहे. काही गडकोट काळाच्या ओघात नष्ट होत चालले आहेत. तर काहींचा कुठेच कागदोपत्री नोंद आढळत नाही. मात्र प्रत्यक्ष या गडावर गेल्यास अनेक ऐतिहासिक अवशेष बघून कशी काळी हा गड होता याची प्रचिती येते. असाच एक पुरातत्व खात्याच्या दृष्टीने दुर्लक्षित असलेला देवगड तालुक्यातील चाफेड येथील ‘दुर्गाचा डोंगर’. नुकतीच दुर्ग मावळा प्रतिष्ठान आणि चाफेड ग्रामस्थांनी या गडावर भ्रमंती करून संशोधन करण्याचा प्रयत्न केला. चाफेड गावचे तरुण सरपंच किरण मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे कोकण विभागीय अध्यक्ष गणेश नाईक, प्रसाद पेंडुरकर, साळशी प्रशालेच्या शिक्षिका हेमलता जाधव, माजी सरपंच आकाश राणे, माजी उपसरपंच तुकाराम घाडी, माजी सरपंच संतोष साळसकर, पंढरीनाथ कांडर, सुधाकर भोगले, प्रदीप घाडी, महेश घाडी, महेश परब, दयानंद राणे, विलास घाडी, सोहम घाडी आदींनी गावचे ग्रामदैवत श्री गांगेश्र्वर – रासाई देवीचे दर्शन घेऊन या गडाची माहिती घेण्यासाठी गडावर भ्रमंती केली.

चाफेड गांव हा देवगड तालुक्यातील शेवटच्या टोकाला वसलेला आहे. पूर्वी या गावाला “दडगवली” असे म्हणायचे. अशा या गावात पूर्वेकडील भागात समुद्रसपाटीपासून सुमारे १५०० फूट उंचीचा एक भलामोठा डोंगर आहे. या डोंगरालाच ” दुर्गाचा डोंगर ” असे म्हणतात.


या गडाचा परिसर सुमारे २० एकरचा असून याठिकाणी खूप झाडीझुडपी, वेली वाढल्यामुळे चालताना अडथळा निर्माण होतो. पण एकदा का या गडावर गेल्यास तिथे अनेक ऐतिहासिक पाऊलखुणा बघून डोळ्याचे पारणे फेडते. सर्वप्रथम नजरेस पडते ती जांभ्या दगडात कोरलेली गोलाई आकाराची छोटी ५ फुटाची विहीर. तिला ‘घोड्याची पाग” असेही म्हणतात. सद्या ही विहीर बुजत चालली आहे. या विहिरीचे उत्खनन होणे गरजेचे आहे. या गडाच्या मध्यभागी पूर्वेकडे बुरुजाचे ढासळलेले बांधकाम दिसते. गडाची तटबंदी ढासळलेली दिसते. याच मध्यभागी एक मोठा चिरेबंदी चौथरा आहे. या चौथऱ्याला ‘राजवाडा’ असेही म्हणतात. या चौथऱ्याचे बांधकाम कोरीव दगडात केले गेलेले आहे. या चौथऱ्याला ३ पायऱ्या देखील आहेत त्यामुळे नक्कीच याठिकाणी पूर्वी एखादी राजवाड्याची वास्तू असावी. आजूबाजूला अनेक कोरीव जांभे दगड अस्ताव्यस्त पडलेले आढळतात. या ठिकाणचे उत्खनन आणि संशोधन झाल्यास अनेक बाबींचा उलगडा होऊ शकतो. यानंतर नजरेस पडतात ते ४० फूट लांबी, रुंदी, खोलीचे जांभ्या दगडात कोरलेले २ मोठे हौद. सध्या या दोन्ही हौदात खूप झाडीझुडपी वाढलेली आहे. तिथूनच जवळच्या अंतरावर पूर्वेकडील भागात या गडाचे मुख्य प्रवेशद्वार असून हे प्रवेशद्वार जांभ्या दगडात कोरीव नक्षीकाम केलेले आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांना बसण्यासाठी जागा आहे.

सध्या या प्रवेशद्वारावर मोठे जांभा दगड पडलेले असल्यामुळे आता प्रवेश करताना वाकून जावे लागते. याठिकाणी वटवाघुळांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे. याच मुख्यप्रवेशद्वाराच्या बाजूला भलेमोठे भुयार आहे. या भूयाराच्या तोंडावर मोठा दगड असल्यामुळे आत प्रवेश करता येत नाही. मात्र हा मोठा दगड बाजूला करून आत गेल्यास नक्कीच आश्चर्यकारक बाबींचा उलगडा होऊ शकतो. येथील जाणकार मंडळींच्या म्हणण्यानुसार या भुयारात ५०० माणसे बसू शकतील एव्हढी अवाढव्य जागा आहे. पूर्वीच्या राजेलोकांचे लपण्याचे किंव्हा गुप्तचर्चा करण्याचे हे ठिकाण असावे. सध्या या भुयारात साळिंदर, घोडपर आदी रानटी प्राण्यांचे वास्तव्य आढळते. या भूयाराचे उत्खनन आणि संशोधन झाल्यास एखाद्या ऐतिहासिक मौल्यवान वस्तू , दस्तऐवज सापडू शकतील असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या गडाच्या दक्षिणेला साळस महल मधील ऐतिहासिक ‘सदानंद गड’ तर उत्तरेला कोळोशी येथील ऐतिहासिक ‘निशाण टेंब’ आहे.
येत्या काही दिवसात दुर्गमावळा प्रतिष्ठान आणि चाफेड ग्रामस्थ मिळून पुन्हा एकदा या गडावर जाऊन तेथील साफसफाई करून दुर्ग गडाचे संवर्धनाचे कार्य हाती घेणार आहेत. चाफेडचा दुर्गाचा डोंगर ही गावाची खऱ्या अर्थाने शान आहे त्यासाठी चाफेड ग्रामपंचायतीचे सर्वोतोपरी सहकार्य असेल. येत्या काही दिवसात गडावर शोध आणि संशोधन – साफसफाई मोहिमेत गावातील प्रत्येक व्यक्तीने सहभागी होऊन सहकार्य करावे. असे नम्र आवाहन सरपंच किरण मेस्त्री यांनी केले.