वाढदिवस विशेष | विवेक परब | चिंदर :
गांव ….सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अतिदुर्गम म्हणावे लागेल असेच होते…चिंदर सडेवाडी…!
कुटुंब…. ढोर कष्टाने मोलमजुरी करुनही प्रसंगी पोटाला चिमटा काढत उपजिवीका करणारे पण संपूर्ण मानी…एक सुर्वे आडनावाचे..! दीपक…याच कुटुंबातला एक अंकुर जो घरच्या खडतर सर्वांगीण परिस्थितीत पेरले गेलेलं बीज..किंवा वाढणारा अंकुर…!
अर्थात् आजचे चिंदर गांवचे उपसरपंच व यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक असलेले श्री.दिपक सुर्वे..
काही कहाण्या सिनेमातही नाही मावू शकत कारण त्याचा त्यांनी कधीच बाऊ केलेला नसतो तशीच एक खूप साधी वाटणारी पण सात्विक जीवनगाथा आहेत ..श्री.दिपक सुर्वे….चिंदर उपसरपंच.
लहानपणापासून पोटची भूक व जीवनाची गरज म्हणून मोलमजुरी करताना अनुभव घेऊन स्वतः लहान मोठी कामे घेऊन दिपक यांनी त्यांचा बाल व किशोर उदरनिर्वाह चालू केला….केला म्हणण्यापेक्षा अल्पवयात करावा लागला.
केसांना व कपड्यांना अवखळपणे भूषविण्याच्या अल्लड अशा सोळाव्या वर्षीच डोक्यावरुन पित्याचे छत्रच हलवले…तर उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी चालू ही चालू केली म्हणण्यापेक्षा चालू झाली असेच म्हणावे लागते.
परंत दिपक यांना त्यांच्या मातृकृपेचा जबरदस्त व भक्कम आधार होता.
मातृरुपी पणतीने दिपक यांच्यातील कुठलेच वैचारिक वंगण व समाजजाणीव कमी पडू दिली नव्हती .आईने पैसा किती आहे यापेक्षा प्रत्येक पैशाचे मोल जाणवून देणारे संस्कार त्यांच्यात रुजविले होते.
पुढे काळात दिपक यांचा विवाह शांती यांच्याशी झाला आणि एक “लेडीलक” चालु झाले…..अर्थात हे शाब्दिक आहे कारण मातृरुपी कृपा त्यांना जन्मजात मिळाली होती परंतु शांतीजींच्या येण्याने त्या कृपेचा बहर दिपक सुर्वे नामक व्यक्तिमत्वाच्या रोपट्याला येऊ लागला.
हळुहळु बांधकाम व्यवसायात दिपक यांचे वेगळे नांव प्रस्थापित होऊ लागले .
सामाजिक क्षेत्राची त्यांची ओढ त्यांना राजकारणाद्वारे जगता येऊ लागली. दिपक यांचे समाजजाणीवेचे काम खडतर प्रवासात ही चालू होते. वायंगणी, तोंडवळी, कालावल या भागात दिपक हे सामाजिक कार्यात अग्रेसर होते.
२०२०-२१ ग्रामपंचायत निवडणूकीत दिपक हे चिंदर सडेवाडी, तेरई-भगवंतगड या प्रभागातून ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. त्यांची कार्यपध्दती पाहून पक्षांने त्यांना उपसरपंच ही जबाबदारी दिली गेली.
उपसरपंच पदाची जबाबदारी स्विकारताच काही कालावधीतच दिपक यांची सत्व परिक्षा घेण्यासाठी कोरोना महामारीची दुसरी लाट गावात घेऊन ठेपली आणि भयावह स्थिती निर्माण झाली. अशा स्थितीत दिपक यांनी त्यांच्या इतर सहकार्यांसमवेत धिरोदात्तपणे समस्येला तोंड दिले. स्वतःच्या गाडीने रुग्णांना हाॅस्पिटल मध्ये घेऊन जाणे, त्यांना धीर देणे, गांवातील प्रत्येक वाडीत जाऊन आत्मियतेने रुग्णाची विचारपूस करणे अशा कोरोना काळातील जोखमीच्या कृतीही त्यांनी स्वताःचा पैसा खर्च करुन केल्या..! रुग्णांची होणारी हेळसांड व घाबरून होणारे कोरोना रूग्णाचे मृत्यू पाहून मित्रमंडळाने दिलेला विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचा सल्ला मनावर घेऊन त्यांनी चिंदरच्या क्र.1 शाळेत विलगिकरण कक्ष स्थापन केला. समाजातील सामान्य लोक कोरोनोच्या भितीने सहकार्य करत नसल्याचे पाहून मित्रपरिवाराच्या सहकार्याने त्यांनी उपसरपंच म्हणून बढ़ेजाव न मिरवता सर्व कामे केली. रुग्णांना धीर देण्याचे, हे नको ते पाहाण्याचे सत्कार्य त्यांनी चालूच ठेवले.
कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तींवर अंतिम संस्कार करण्यात कुणीही धजत नसताना स्वतः पि.पी.ई किट घालुन अंतिम संस्कार केले. एक वेळ अशाच पुण्याईच्या जोरावर अंतिम संस्कार करण्यासाठी जात असताना मोठ्या अपघातातून दिपकजी बालंबाल बचावले. काही वेळा मित्र परिवाराला बरोबर घेऊन तालुक्यातील अनेक गांवात कोरोना रूग्णांनवर रात्री अपरात्री जाऊन अंतिम संस्कार केले. कोरोना काळात लसीकरणासाठी होणारा गोंधळ लक्षात आल्यानंतर स्वतः सकाळी ग्रामपंचायत मध्ये येऊन नियोजन केले.
दिपक आपले मनोगत व्यक्त करताना नेहमी सांगतात त्यांना पोकळ प्रसिद्धी नकोय तर त्यांच्या कामाने लोकांपर्यंत एका सजग समाजजाणिवेचा दिपक पोहोचण्याचा प्रयत्न ते करतात..एका दिपकाचा प्रकाश पसरवतात …!
शांत, सुस्वभावी, निर्मळ मनाच्या अशा चिंदर गावच्या उपक्रमशील उपसरपंचांना चिंदर गांव आणि परिसरांतून अनेक शुभेच्छा येतच राहणार कारण जनमानसाला माहीत आहेच की एक “अंकुर ते झाड असा जीवतोड मेहनतीच्या प्रकाशाचा प्रवास…अर्थात् दिपक सुर्वे आहेत..!”
विवेक परब (आपली सिंधुनगरी न्यूज, चिंदर)
शुभेच्छुक : श्री.धोंडी चिंदरकर (मालवण तालुका,भाजप अध्यक्ष )
:श्री.संतोष गांवकर (तंटामुक्ती अध्यक्ष, चिंदर)
: श्री.भाई तावडे (सामाजिक कार्यकर्ते)