सिनेमा समिक्षण .
अवखळ, भोळी गीत आणि खचलेला व थोडासा स्वतःपासूनच दूर होऊ पहाणारा आदित्य..यांची कथा म्हणजे 2007 साली प्रदर्शित झालेला व दिग्दर्शक इम्तियाज़ अली यांचा हिंदी सिनेमा ‘ जब वुई मेट…!’
करीना कपूर ख़ानची गीत आणि शाहीद कपूरचा आदित्य ही दोन विरुद्धध्रुवीय जोडी एका योगायोगाने मुंबईहून पंजाबकडे जाणार्या ट्रेनमध्ये भेटतात. विविध प्रकारे स्वतःला अलिप्त ठेवणार्या आदित्यला सतत प्रत्येकाशी सलगी करुन जगू पहाणार्या गीतच्या स्वभावाचा पहिल्या भेटीपासूनच तिट़कारा येत असतो. तरिही एकाच रेल्वे प्रवासामध्ये विविध कारणांनी तो तिचा तिट़कारा करण्याचा त्याच्या स्वभावाची मालिका अंगवळणी पाडू लागतो. गडबड गोंधळ करत अखंड बडबड करणार्या गीतची रेल्वे निव्वळ फलाटावरील स्टाॅलमधील मिनरल वाॅटर बाटलीच्या तीन रुपयांच्या घासाघिशीत चुकते आणि त्याचे बिनदिक्कत खापर ती आदित्यवर फोडून त्याला तिला पंजाबपर्यंत पोचवायची प्रायश्चित्तवजा सजाच सुनावते. बोलण्याआधी पाच पैशांचाही विचार न करणारी गीत व एकेक शब्द पाऊंडसमान महाग असेल असे वाटणारा आदित्य ही खरंतर तरुणाईवर जादू न घालू शकणारी पात्रे आहेत परंतु इथेच इम्तियाज़ अलीचे दिग्दर्शन व कॅमेर्याचा अभ्यास सिनेमाला चैतन्य देऊन जातो.
खरेतर वरवर खूप अवखळ आणि बिनधास्त वाटणारी गीत हे एक अजबच रसायन असते . ” मै मेरी सबसे फेवरेट हूं” म्हणताना तिचे लकाकणारे डोळे, स्वेटरला घट्ट पकडत आत्ममग्नतेचा आनंद आणि तरिही स्त्री पुरुष नात्यातील एक अदृश्य लकीर सांभाळताना तिचे सावध असणे असे सगळेच करीना कपूरने उत्तम वठवले आहे.
आदित्य कश्यप हा बाहेरुन संपूर्ण समतोल पण मनातून सपशेल तुटलेला तरुण स्वतःच्या नियतीला, नशिबाला,कुटुंबाला दोष देत देत प्रपंच व कर्मापासून दूर जाताना दिसणारा शाहीद कपूर तरुणाईच्या सो काॅल्ड जंटल कूलनेसमागील अस्ताव्यस्तता परिणामकारकरित्या दाखवून जातो.
नंतर गीत तिच्या घरी पोहोचते का….? आदित्य तिला तिच्या बालपणीपासून लग्न करण्याच्या स्वप्नापर्यंत पोहोचवतो का..? आणि त्या दोघांचे जीवनातील लोहमार्ग कुठकुठली स्थानके अनुभवतात हे पहाण्यासाठी ‘ जब वुई मेट’ हा सिनेमा जरुर पहावा लागेल.
पंजाबी भाषेचा प्रभाव जरी असला तरिही तो अतिरिक्त नसून खूपशा रिक्त भावनांचा तो एक व्यक्तता मंच भासतो. या सिनेमाचे संगीत अतिशय श्रवणीय असून पटकथा संयत प्रवाही आहे.
हिंदी व पंजाबी सिनेमातील अगदी हाताने ख़ुडून आणलेत असेच चरित्र अभिनेते व अभिनेत्रींचा उत्तम वावर हेही या सिनेमाचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
दारासिंह यांची दोनच दृष्ये एका भाबड्या वडिलकीची जरब नक्कीच देऊन जातात. पैगंबरवासी आसिफ बसराचा फलाटावरील स्त्रीलंपट स्टाॅलवाला आणि किशोर प्रधान यांनी रंगवलेला नाहक समुपदेशक स्टेशनमास्तर नक्कीच लक्षात रहातात.
26 ऑक्टोबर 2007 ला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने भारतीय सिनेमात किती क्रांती घडवली वगैरे व्यावसायिक त्याच्या घसघशीत व्यावसायिक गणितातून समजत नाही परंतु जब वुई मेट पाहून अनेक स्त्री पुरुषात व खासकरुन युवावर्गात स्वतःला स्वतःचे फेवरेट मानायचा एक ट्रेंड नक्कीच सुरु झाला.
अनलिमिटेड टाॅकटाईम घेऊन जन्मलेल्या गीतच्या अंतरंगात किती धीरगंभीर नीरव शांतता असते ते तिचे तिला व प्रेक्षकांना जेंव्हा समजते तेंव्हा तिला त्या खोल डोहातून बाहेर काढताना होणारी आदित्यची धडपड एकप्रकारे समाज समुपदेशकाचेच काम करते. उभारी देणारेच जेंव्हा खचतात तेंव्हा त्यांच्यापासून उभारी घेतलेले त्यांना कसे काय उभारी देत देत कुटुंब, मैत्री व समाज घडवू शकतात की नाही हे गीत व आदित्य दाखवून जातात.
एक तप झालंय या सिनेमाला भेटून. …
पण या भेटीत केलेल्या मौज़ा ही मौज़ाचा नगाड़ा आजही मनाच्या अंगणात फुलं खिलवतोच…!
सुयोग पंडित.(मुख्य संपादक)