मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या महत्वपूर्ण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांच्या पुढाकाराने तसेच कणकवली तालुका व्यापारी संघटना, कणकवली यांच्या सहकार्याने सोमवारी २५ डिसेंबरला सकाळी १० ते १२ यावेळेत हॉटेल साई दीप पॅलेस, रेल्वे स्टेशन समोर, कणकवली येथे ही सभा संपन्न होईल. या महत्त्वपूर्ण सभेसाठी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, मुंबई या संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या सभेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण, वैभववाडी, आचिर्णे नांदगाव, कणकवली या ५ रेल्वे स्टेशन वरील अगणित अडचणी, समस्या बाबत गांभीर्याने चर्चा करण्यात येणार आहे.
त्याशिवाय कणकवली व वैभववाडी तालुक्यात असलेल्या या ५ ही स्टेशनवर नवीन गाड्यांचे थांबे, आवश्यक सोयी/सुविधा, प्लॅटफॉर्मवर मोडून पडलेल्या निवारा शेड व इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा करून सर्व मागण्यांचे एकत्रित निवेदन तयार रेल्वे मंत्री, भारत सरकार यांना प्रत्यक्ष भेटून देण्याबाबत नियोजन एकमताने करण्यात येणार आहे.
कणकवली, वैभववाडी, देवगड आणि मालवण तालुक्यातील पिडित रेल्वे प्रवासी, कोकण रेल्वे बाबत आस्था असणाऱ्या सुजाण नागरिक व सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ कार्यकर्त्यांनी सहकार्य, पाठिंबा आणि मार्गदर्शन करण्यासाठी या सभेला उपस्थित रहावे असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीचे सचिव श्री. मिहीर मठकर व उपाध्यक्ष ॲड. श्री. नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे..