आक्रमक लोकनेता श्री. हरी खोबरेकर वाढदिवस विशेष.
सुयोग पंडित | मुख्य संपादक : स्वॅग ही गोष्ट काळानुरुप जरूर बदलत असते परंतु तो स्वॅग लोकोपयोगी असेल तर त्याचा ‘अध्याय’ बनतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या अभ्यासू व आक्रमक नेत्यांच्या मांदियाळीत असेच एक समकालीन सर्वात युवा नांव आहे श्री हरी खोबरेकर. माजी जिल्हा परीषद सदस्य,
शिवसेना तालुकाप्रमुख, मच्छीमार नेता आणि मुसंडी मारत विविध मुद्द्यांबाबत संघटनात्मक बांधणीसाठी झटणारे एक तुमच्या आमच्यातले तरिही वेगळ्या प्रकाशाचे पाईक असणारे व्यक्तीमत्व म्हणजे हरी खोबरेकर.
समाजकारणाची इच्छा बाळगताना राजकारणाचे स्टीअरींग हे अत्यावश्यक आहे कारण समाजकार्य करताना त्याची फलश्रृती राजकीय प्रक्रियेतून जलद व सनदशीर मार्गाने शक्य असते हे अचूक जाणत हरी खोबरेकर यांनी समाजकारणाच्या पटलावर राजकारणातील प्रवेशाचे द्वार निवडले. पारंपारिक मच्छिमार समाजातील जन्म, सामान्य बालपण आणि तुफान शारिरीक व मानसीक धैर्य असणार्या हरी यांना राजकीय स्तरावर कधीतरी संघर्ष, मतभेद आणि क्वचित प्रसंगी चांगल्या सामाजिक संबंधांची ताटातूट होऊ शकते हे माहीत होते परंतु त्यांची दृष्टी ही समाजहितासाठी आधीच विकसीत होत गेल्याने तत्व व मुद्दे या पलिकडे त्यांनी स्वतःहून कोणाशी फारकत घेतली नाही. समाजकार्यात वाहून घेताना राजकारणाच्या वाहनात दरवेळी सत्तेच्या चाव्या हाती येतीलच याची शाश्वती कोणालाच नसते परंतु विरोधक म्हणून शुद्ध राजकारणात राहून लोकांसाठी व स्वतःच्या उद्देशांसाठी कार्यरत रहाता येते ही शिकवण युवा हरी खोबरेकर यांनी आत्मसात केलेली होती. राजकारणातील चढ उतार, शह प्रतिशह यांच्याकडे हरी खोबरेकर अगदी प्रसन्नपणे बघत नेहमी म्हणतात की तुम्ही छोटे मोठे फटाके ‘फोडतच’ रहा मी बाॅम्ब घेऊनच तयार असणार..!’ हरी यांनी संकट, समस्या व दुःख या तिघांना हे सडेतोड उत्तर दिल्यानेच त्यांच्या स्वॅगचा वेगळा ‘अध्याय’ बनला आहे.
राजकीय महासागरात स्वतःतील ‘मच्छिमार मन’ त्यांनी बुडू दिले नाही. त्यांच्या बोलण्यात नेहमीच आजपर्यंत कोकणच्या किनारपट्टीवरील मच्छिमारांच्या पिढ्यांच्या हाल अपेष्टा, संघर्ष आणि तरिही त्याला छत्रपतींच्या कृपा आशिर्वादाचा मिळालेला आधार यांचा उल्लेख असतो. मालवण तालुक्यातील दुर्गातिदुर्गम भागातला प्रत्येक जण हरी खोबरेकर यांना राजकारण विरहीत सुद्धा ओळखतो हे विशेष.. राजकारणातील त्यांचा स्वॅग नेहमी सहकार्य, प्रोत्साहन व संघटनात्मक बांधणी या तत्वांवर चालतो.
हरी खोबरेकर हे एक निष्ठावंत शिवसैनिक, किनारपट्टीवरील वाळूचा सुपुत्र आणि आक्रमकता असूनही कधीच आगाऊपणाचा शिक्का बसला नसलेले राजकीय व्यक्तिमत्व आहेत. स्वच्छ शुभ्र स्मितहास्य, मार्मिक मालवणी व मराठी भाषा, नेहमी लोकांमध्ये राहून स्वतःला शांतता मिळवणारा एक मित्र असणारे हरी खोबरेकर यांना आज १५ नोव्हेंबरला वाढदिवस….त्यांना वाढदिवसाच्या विशेष हार्दिक शुभेच्छा.
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल समूह