चिंदर | विवेक परब :(विशेष वृत्त): नुकतीच मालवणचे नगरसेवक श्री दीपक पाटकर यांनी निराधार व्यक्तिच्या केलेल्या अंत्यसंस्काराची समाजजाणिवेची संवेदना जागवणारी घटना मालवण तालुक्याने पाहिली आहे..ऐकली आहे. नगरसेवक श्री. दीपक पाटकर यांना मालवणी जनमानसाने मनोमन सामाजिक धन्यवादही दिले.
“जगी ज्यास कोणी नाही…त्यास देव आहे…”, या पंक्तिंची तशीच प्रचिती येणारी घटना चिंदर येथील भटवाडी इथेही घडली आहे.
चिंदर भटवाडी येथील एका वयोवृध्दाचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्ती बाहेर गावी आहेत. परिसरातील इतर कुणीही वृध्दावर अंतिमसंस्कार करण्यास तयार नव्हते पण भगवती उत्साही मंडळाचे अध्यक्ष श्री. सुनिल मनोहर पवार यांनी व मंडळाच्या इतर सदस्यांनी सहकार्याने मुखाग्नी पर्यंतचे अंतिम सोपस्कर करायचे ठरवले आणि ते विधीवत पूर्ण केले.
श्री सुनिल पवार यांच्या ह्या विचाराचे स्वतः सुनिल पवार व भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी यांची आता सर्वच स्तरांतून प्रशंसा होत आहे.
सुनिल पवार यांनी कोरोना काळात त्यांच्या काही सहका-यांच्या सहाय्याने कोरोना संक्रमित मृतांवरदेखील अंतिम संस्कार केले होते. त्यामुळे त्यांचा कोरोना योध्दा म्हणूनही सन्मान करण्यात आला होता.
सुनिल पवार हे मृत्यूपश्चातची मानवी शरिराची हतबलता जाणून त्याला मोक्ष देऊ पहाणारे देवदूतच नव्हेत का…!