तारकर्ली | सुरेश बापार्डेकर : राज्य सरकार तर्फे यंदाचा दीपोत्सव तथा दिवाळी २०२३ साठी ‘आनंदाचा शिधा’ वाटप उद्या बुधवारी २५ ऑक्टोबर पासून करण्यात येणार आहे. तसे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. राज्यात या योजनेअंतर्गत १ कोटी ५८ लाख ३३ हजार ७१८ कार्डधारकांना लाभ दिला जाणार आहे.
या योजनेअंतर्गत यापूर्वी चार वस्तू दिल्या जात होत्या. त्यात दिवाळीसाठी मैदा आणि पोहे यांचा समावेश केला आहे. यामुळे साखर, खाद्यतेल प्रत्येकी एक किलो, रवा, चणाडाळ, मैदा आणि पोहे प्रत्येकी अर्धा किलो, अशा सहा वस्तूंचा संच शंभर रुपयांत दिला जाणार आहे. कार्डधारकांना देण्यात येणार्या या संचातील वस्तूंच्या दर्जाबाबत दक्षता घ्या, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. मैदा आणि रवा या वस्तूंची खाण्यायोग्य मुदत संपण्यास किमान ३ महिन्यांपेक्षा अधिक, तर अन्य ४ पदार्थांच्यासाठी चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधी राहणार नाही, याचीही खात्री करण्याची सूचना देण्यात आली आहे.