ब्यूरो न्यूज | क्रीडा : १४ ऑक्टोबरला झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात शनिवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना झाला. यात भारताने एकतर्फी विजय मिळवत पाकिस्तानला ७ गड्यांनी नामुष्की आणत धूळ चारली. सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला विराट कोहलीने त्याची जर्सी भेट दिली.
विराट कोहलीचा आणि बाबर आझमचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र यावरून पाकिस्तानचे माजी कर्णधार वसिम आक्रम बाबर आझमवर संतापले आहेत. त्यांनी चवताळून म्हटले की हे सगळे करण्याचा तो दिवस नव्हता. भारताने पाकिस्तानला वर्ल्ड कप २०२३मधल्या १२ व्या सामन्यात ७ गडी राखून हरवलं. तसंच पाकिस्तानविरुद्ध वर्ल्ड कपमधील विजयाची परंपरा कायम राखली. या विजयानंतर भारताने गुण तालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. भारताच्या विजयानंतर विराट कोहली आणि बाबर आझम बोलताना दिसले. यावेळी कोहलीने बाबर आझमला दोन जर्सी भेट दिल्या.
वसिम अक्रम यांनी पाकिस्तानी दूरचित्रवाणी वाहिनीवर बोलताना एका चाहत्याच्या प्रश्नाला यासंबंधी उत्तर देताना त्यांचा अक्षरशः रागाने तीळपापड झाला होता. बाबर आझमला विराटकडून दोन जर्सी मिळाल्या. प्रत्येकजण हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघत आहे. मात्र निराशाजनक कामगिरीनंतर तुमच्या चाहत्यांना वेदना झाल्या आहेत. त्यानंतर हे जे झालं ते खासगी असायला हवे होते. सर्वांसमोर मैदानात तरी करायला नको होते. तुम्हाला जर करायचं होतं, जर तुमच्या काकाच्या मुलाने तुमच्याकडे कोहलीची जर्सी आणायला सांगितलीय तर सामन्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये असं करायला हवं होतं.