हरिनाम गर्ज़ता, नाही भय चिंता ; साळशीत अखंड हरिनाम सप्ताह भक्तीमय वातावरणात संपन्न ;पौराणिक चित्र देखावा ठरला विशेष आकर्षण ; तब्बल २१ गांवातील भजनी दिंड्यांचा हरिनाम सप्ताहात विशेष सहभाग..!
संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या अध्यात्मिक, ऐतिहासिक व शिवकालीन महत्व असलेल्या साळशी गांवातील श्री देवी पावणाई देवालयात ४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर असा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला.
“विठ्ठल नामाची शाळा भरली…. विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला…. पंढरीचा विठ्ठल विटेवरी…. हरिनामाचा गजर होतो साळशी गावात..,” या सारख्या भक्तीगीतां बरोबरच टाळ-मृदुंगाच्या व विठ्ठल नामाच्या गजराने अवधी साळशी दुमदुमून गेली. या हरिनाम सप्ताहात शेवटच्या रात्री साळशी येथील श्री संत सिध्देश्वर पावणाई प्रासादिक भजन मंडळाने काढलेला ‘त्राटिका वध’ हा पौराणिक चित्र देखावा सर्वांसाठी आकर्षण ठरला.
या हरिनाम सप्ताहानिमित्त श्री पावणाई देवालयात आकर्षक मंदिर सजावट करुन विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या हरिनाम सप्ताहात वरेरी, भरणी – घाडी वाडी कणकवली, चाफेड- घाडीवाडी , चाफेड भोगलेवाडी, आयनल – रोहिलेवाडी, रामनगर शिरगांव, मुरमणेवाडी तारामुंबरी, वळीवंडे, मठवुद्रुक , खुडी, आसोली वेंगुर्ले अशा २१ गावातील भजनी दिंड्या हरिनाम सप्ताहात सहभागी झाल्या होत्या. कोळोशी येथील ‘नवजीवन भगिनी महिला भजन मंडळ’ यांच्या सहभागामुळे हरिनाम सप्ताहाची भक्ती रंगत वाढली.
साळशीतील अंगणवाडीच्या चिमुकल्यांनीही हरिनाम
सप्ताहात भाग घेतला. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सातव्या रात्री साळशी येथील श्री संत सिध्देश्वर पावणाई प्रासादिक भजन मंडळाने रंगीत दिंडी काढून ‘त्राटिका वध’ हा पौराणीक चित्र देखावा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये राम – अमेय माळवदे, लक्ष्मण- सचिन माळवदे, ऋषी- निखिल पारधी, पंकज लाड व दिनेश मणचेकर,ञाटिका-संतोष नारिंग्रेकर, यांनी भूमिका साकारल्या होत्या. तसेच राजेंद्र घाडी, प्रविण नाडणकर , श्रेयस नाडणकर, पियुष गांवकर, श्रवण गावकर, प्रकाश किंजवडेकर यांनीही आकर्षक वेशभूषा सादर केली होती. हा पौराणिक चिञ देखावा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती तसेच माहेरवाशिणींचीही आवर्जून उपस्थिती होती. या हरिनाम सप्ताहाची सांगता ११ ऑक्टोबरला पहाटे काकड आरतीने झाली. या हरिनाम सप्ताहामुळे गावात भक्तीमय वातावरण निर्माण होऊन विठ्ठल नामाच्या गजराने गाव दुमदुमून गेला.
या अखंड हरिनाम सप्ताहा दरम्यान प्रत्येक साळशी वासिय अध्यात्मिक मुक्ततेसोबत ‘हरिनाम गर्ज़ता, नाही भय चिंता..’ अशाच भक्ती भावनेत जणू न्हाऊन निघाला आहे अशी प्रतिक्रिया सहभागी भाविक व साळशी वासियांनी दिली.