चुलत भावाला संशयीत म्हणून अटक.
ब्यूरो न्यूज | सातारा : साताऱ्यातील माण तालुक्यातील आंधळी गावात पती पत्नीचा अज्ञातांनी धारदार शस्त्रानं वार करुन खून केल्यानं खळबळ उडाली आहे. खुनामागचे कारण अद्याप अस्पष्ट असून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सातारा पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात गेलेल्या दाम्पत्याची अज्ञातानं धारदार शस्त्राने हत्या केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील माण तालुक्यात घडलीय. संजय रामचंद्र पवार (वय ४९) आणि मनिषा संजय पवार (वय ४५) असं खून झालेल्या दांपत्याचे नांव आहे.
माण तालुक्यातील आंधळी गावातील संजय व मनिषा हे दांपत्य आपल्या ‘पवार दरा’ नांवाच्या शिवारातील पिकाला पाणी देण्यासाठी शनिवारी रात्री गेले होते. यावेळी रात्री साधारणतः १० च्या दरम्यान अज्ञातांनी धारदार शस्त्रानं त्यांच्या डोक्यावर, मानेवर, गळ्यावर वार करून या दाम्पत्याची निर्घृण हत्या केली आहे.
रविवारी सकाळच्या सुमारास परिसरातील शेतकरी शेतात जात असताना संजय व मनिषा पवार दांपत्याचे रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळून आले. त्यामुळं हत्येची घटना उघडकीस आली. नागरिकांनी मृतदेह बघताच आंधळी गावच्या पोलीस पाटलांना या घटनेची माहिती दिली. पोलीस पाटलानं यासंदर्भात पोलीस ठाण्यात कळविल्यानंतर दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस पथकासोबत घटनास्थळी दाखल झाले.
या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसंच संशयिताच्या तपासासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. याप्रकरणी दहिवडी पोलिसांना काही धागेदोरे मिळाले आहेत. या दांपत्याच्या हत्येमागे शेताचा वाद की अन्य कारण आहे हे संशयिताची कसून चौकशी करुन घेतल्यानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
या खुनाप्रकरणी दाम्पत्याचा सख्ख्या चुलत भावाला ताब्यात घेत चौकशी सुरु केलीय. त्याच्याकडून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. – सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे दाम्पत्याच्या खून प्रकरणात सख्ख्या चुलत भावाला दहिवडी पोलिसांनी अटक केलीय. दादासो उर्फ बापूराव शहाजी पवार असे या संशयिताचे नांव आहे.