मुंबई | ब्यूरो न्यूज : उद्या बुधवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. मागील एक महिन्यापासून राज्यात पावसाने विश्रांती दिली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा समाधानकारक पावसाकडे लागल्या आहेत. राज्याच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आज पडत आहेत.
पावसाने जवळपास एक महिन्याचा खंड दिला. त्यामुळे आता शेतकरी चांगल्या पावसाची वाट पाहत आहेत. पण काल (दि.२८) राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता. आज काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या पण जोरदार पाऊस नव्हता. आज (दि.२९) रोजी पुणे, सातारा, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये ठिकठिकाणी विजांसह हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.
दरम्यान, बुधवारी मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सोलापूर सांगली आणि सातारा, तर कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर राज्याच्या इतर भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील, असाही अंदाज हवामान खात्याने दिला आहे.