एकता दिव्यांग विकास संस्थेच्या उपोषणाच्या निवेदनाची प्रांताधिकाऱ्यांनी घेतली दखल.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग बंधू भगिनिंसाठी सक्रीय असलेल्या
‘एकता दिव्यांग विकास संस्था’ यांच्या माध्यमातून दिव्यांगांच्या वाढत्या समस्या व प्रश्नांबाबत वारंवार लक्षवेधून देखील शासन प्रशासन किंवा राजकीय लोकप्रतिनिधी हे उचित् दखल घेत नसल्यामुळे १५ ऑगस्ट २०२३ रोजी तहसीलदार तथा प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचे निवेदन देण्यात आले होते. या निवेदनानंतर दिव्यांग व्यक्तींच्या काही समस्या व प्रशासकीय स्तरावर चर्चा करून काही शंकांचे निरासन करण्यात आले. त्यानंतर प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी आपण या संदर्भात उपोषणापूर्वी या समस्या व मागण्या संदर्भात दिव्यांग व्यक्ती तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊ त्यानंतर पुढील दिशा ठरवू असे, आश्वासन दिले होते. त्यानुसार आज ९ ऑगस्टला दुपारी ३ वाजता कणकवली तहसीलदार कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मुख्याधिकारी नगरपंचायत कणकवली, गटविकास अधिकारी पंचायत समिती कणकवली, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ओरोस, सिंधुदुर्ग, वैदयकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय कणकवली, स्टेशन मास्तर रेल्वे स्टेशन कणकवली, ग्रामीण रुग्णालय कणकवली हे उपस्थित राहणार आहेत.
तरी जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींनी आपल्या ज्या काही मागण्या व समस्या आहेत किंवा कोणत्या योजना संदर्भात केलेले प्रस्ताव बाकी असतील, कोणत्याही प्रकारच्या शासकीय कामात अडथळा येत असेल अशा व्यक्तींनी तहसीलदार कार्यालय येथे दुपारी ३ वाजता उपस्थित राहून आपल्या मागण्या व समस्या मांडाव्यात, असे आवाहन एकता दिव्यांग विकास संस्थेचे अध्यक्ष सुनील सावंत यांनी केले आहे.