नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करुळ घाटात काल रात्री ०८ :४५ वाजता एक वॅगनार कार , ३५० फूट खोल दरीत कोसळली. या घटनेची खबर वैभववाडी पोलिस स्टेशनला कळल्यानंतर त्यांनी सह्याद्री जीव रक्षक , करुळ टीम यांच्या सहाय्याने घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु केले. या घटनेत कारचा चालक सुदैवाने सुरक्षितरित्या रस्त्यानजिकच फेकला गेल्याने बचाव कार्य नेमके कुठे करायचे ते कळणे शक्य झाले.
कारमधून दरीत फेकले गेलेल्या कणकवली येथील जोडप्याची बचावकार्यातून केवळ थोड्याच अवधीत दोरीच्या सहाय्याने वैभववाडी पोलिस व सह्याद्री जीवरक्षक टीम करुळने सुटका केली. सुदैवाने दोघांनाही किरकोळच जखमा झाल्या होत्या. दोन्ही जखमींना वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमीक तपासणी व उपचारासाठी आणले गेले. दोघेही सुखरूप असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
या घटनेनंतर वैभववाडी पोलिसांची तत्परता व सह्याद्री जीवरक्षक टीम करुळ यांचे थरारक बचावकार्य याबद्दल जखमींनी आभार मानले आहेत.