मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात यंदा लांबलेल्या मान्सून नंतर आगमन होऊनही हवा तसा न कोसळलेला ‘अत्यावश्यक पाऊस’ सुरु होऊनही हवा तितका सलग कोसळत नव्हता. एखाद दुसर्या मोठ्या सरीनंतर दडी मारणार्या पावसाने अखेर आज रात्रभर संततधार चालू ठेवल्याने मालवण शहराला काल रात्री ९ वाजल्यानंतर सलग ८ तास दमदार संततधार अनुभवता आली आहे.
या रात्रभराच्या पावसानंतर भरड व एस टी स्टॅन्ड परिसरातील काही ज्येष्ठ मालवण वासियांनी हा पाऊस ‘मुळात्सून लागल्या सारखा पडतोय’ अशी प्रतिक्रिया पहाटे व्यक्त केली आहे. मुळात्सून म्हणजे ‘आता तो नियमीत’होईल व खालावलेली भूजल पातळी तसेच शेतीच्या कामांनाही समाधानकारक जोर येईल असा अंदाजही वर्तवला जात आहे. दरम्यान कडक उन्हाळ्या मागोमाग पावसातही विजेचा खेळखंडोबा सुरुच असून काल रात्री ९ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंतच्या पावसात एकूण ६ वेळा वीज पुरवठा खंडीत झाला होता. दरम्यान या संततधारेमुळे कुठलेही गंभीर नुकसान झाल्याचे अधिकृत वृत्त नसल्याचे सूत्रांकडून समजते.