महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दुकानदारांना बंदात सहभागी होण्याचे केले आवाहन…!
कणकवली | उमेश परब :उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकर्यांना अत्यंत क्रूर पद्धतीने गाडीखाली चिरडून मारले. या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. कणकवली शहरात सकाळच्या सत्रात दुकाने उघडली होती. त्यामुळे या बंदला थंडा प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. बंदच्या पार्श्वभूमीवर आप्पासाहेब पर्टवर्धन चौकात पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून दोन दंगल नियंत्रक पथके तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, हा बंद यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडी आक्रमक झाली असून शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शाखा ते आप्पासाहेब पर्टवर्धन चौकापर्यंत फेरी काढत आणि मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून या बंदात सहभागी होण्याचे आवाहन केले. लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाचा निषेध करून या हत्याकांड घडवून आणणार्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी केली. यावेळी आम.वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शहरातून मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, संदेश पारकर, राष्ट्रवादीचे नेते अबीद नाईक, बाबू सावंत, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्यासह शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.