राकेश परब| सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीकर जनतेने ‘देवमाणूस’ अशी उपाधी देत त्यांच्या निवृत्ती सोहळ्याला समाजमाध्यमावर सर्वात वरचे स्थान दिले ते सावंतवाडीचे सेवाभावी स्त्रीरोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर हे सेवानिवृत्तीनंतरही जनतेच्या प्रेमाखातर सेवेसाठी पुन्हा रुजू होणार आहेत. यासाठी पुढाकार घेतलेल्या कोकण संस्थेच्या माध्यमातून ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ मानणारे डॉ. दुर्भाटकर हे सावंतवाडी शहरात केवळ १ रुपया बिदागी घेऊन लवकरच सेवेत दाखल होत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी दिली.
७०-८० च्या दशकात केवळ १ रुपये फी घेऊन बांद्यातील जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असलेले (कै.) डॉ. द. भि. खानोलकर यांच्याच पावलावर पाऊल ठेवत डॉ. दुर्भाटकर यांनी घेतलेल्या निर्णयाने त्यांच्यातील सेवाभावी वृत्तीचा गुण याठिकाणी प्रकर्षाने दृष्टीस पडतो. आपले आयुष्य समाजाच्या सेवेसाठी वेचणारे डॉ. दुर्भाटकर हे सेवानिवृत्तीनंतर एक आनंदी जीवन जगू शकले असते. मात्र लोकांच्या आजीवन सेवेचे व्रत अंगीकरलेले डॉ. दुर्भाटकर निवृत्तीनंतरही लोकांच्या सेवेसाठीच कार्यरत राहण्याचा निर्णय घेतल्याने हे कौतुकास्पद आहे.
डॉक्टर निवृत्त झाल्याची बातमी आणि त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत डॉक्टर सेवानिवृत्त झाल्याचा विडिओ श्री कुबल यांनी पाहिला. एखाद्या डॉक्टरला एवढा अविस्मरणीय निरोप देताना सर्वच लोक भारावून गेलेले दिसत होते, बरोबरच आहे त्यांचे कारण सध्याच्या व्यवसायिक युगात असे कर्तृत्व आणि दातृत्व असलेला माणसातला देव सापडणे हे विश्वास बसणारे नाहीच मुळी.
श्री कुबल म्हणाले की, निरंतर सेवेचे व्रत घेऊन जगणारी माणसे निवृत्त होतात का? हा प्रश्न मला होता. डॉक्टर साहेबांना भेटल्यावर सेवा हे क्षेत्र निवृत्त होणाऱ्यांसाठी नसतेच यावर शिक्कामोर्तब झाले. डॉक्टर सरकारी नोकरीतून नियमाप्रमाणे मुक्त झाले ते सेवानिवृत्त झालेले नाहीत. ज्यांनी आपल्या कामाला देव मानले असेल ते स्वतः सुरू केलेली अविरत सेवा सोडून निवृत्त झाले हे मनाला पटणारे नव्हते. डॉक्टर दुर्भाटकर हसत म्हणाले की या सेवेतून मी कधी निवृत्त होऊच शकत नाही, पुष्पगुच्छ पेक्षा माझ्या कर्तव्य अंमलबजावणीत साथ द्या. त्यानंतर आपण वन रुपी क्लिनिकची संकल्पना मांडली, त्यावेळी त्यांनी तात्काळ होकार दिला.
डॉक्टर म्हणाले की फक्त एक रुपयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो स्त्रियांना रोग मुक्त होण्यास मदत करायची आहे, एक रुपया का? मोफत का नाही. कोणाच्याही स्वाभिमानाला ठेच पोचू नये म्हणून एक रुपया त्यांनी घेण्याचे मान्य केले.
आठवड्याला दर बुधवारी जुना शिरोडा नाक्यावर दुर्वांकुर सोसायटीच्या ६ नंबर गाळ्यात डॉक्टर दुर्भाटकर यांचे सेवेचे व्रत अविरत चालू राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. दुर्भाटकर हे गरजू स्त्रियांची दर बुधवारी एक रुपयात तपासणी करणार आहेत तरी जास्तीत जास्त महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सावंतवाडी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल (९३२४११७९१७) यांनी केले आहे.
भविष्यात बांदा शहरात देखील वन रुपी क्लिनिक सुरु करण्याचा मानस असल्याचे श्री कुबल यांनी सांगितले.