तंबाखूजन्य वस्तूंच्या ऐवजी सॅनिटरी नॅपकिन्स विकत घेऊन गरजू महिलांना द्यायचे केले आवाहन..!
बांदा | राकेश परब : मुंबईतील दादर रेल्वे स्टेशन परिसरात कोकण संस्थेने आरोग्य व समाज जनजागृतीचा एक व्यापक प्रयत्न केला. दरवर्षी कोकण संस्थेच्या माध्यमातून तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. यावर्षी कोकण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या सर्जनशील व्याख्या, शक्तिशाली व्हिज्युअल आणि विचार करायला लावणारे संदेश याद्वारे त्यांनी तंबाखूच्या वापराशी संबंधित गंभीर धोके हजारो लोकांमध्ये प्रभावीपणे मांडले. जागतिक तंबाखू विरोधी दिवशी अनेक कार्यकर्त्यांनी दादर रेल्वे स्टेशन परिसरात तंबाखू विरोधी घोषणा तर दिल्याच तंबाखूजन्य वस्तूंच्या बदली सॅनिटरी नॅपकिन्स विकत घेऊन दिल्यास अनेक गरजू महिलांना त्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत होईल अशा उपदेशात्मक घोषणा दिल्या.
या दरम्यान तंबाखू सेवनामुळे होणारे नुकसान आणि त्याची सवय सोडण्याबाबत सर्व प्रकारची माहिती दिली गेली. या कार्यक्रमांमध्ये तरुणाईचा सक्रिय सहभाग होता. त्यांनाही याबाबत समजावून सांगितले गेले. तंबाखूचे सेवन केल्याने कर्करोगासारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. दरवर्षी लाखो लोकांचा तंबाखू सेवनामुळे मृत्यू होतो. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमीत्त, तंबाखूचे नुकसान सांगून लोकांना तंबाखू सोडण्यास प्रवृत्त केले गेले. यासाठी पद यात्रेचे पण आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्प व्यवस्थापक प्रीती पांगे, श्वेता चोरगे, साक्षी पोटे आणि सुरज कदम यांनी केले तर या अभियान यशस्वी करण्यासाठी रुतुजा कांबळे, मेघना राठोड, निकिता पोटे, निकिता डांगे सिंड्रेला जोसेफ, रिशिका सोळंकी, नेत्रा कदम, नयना जाधव, सालिना बुटेलो, श्वेता सावंत, कोमल कांबळे, विजया वाळके, सायली अंबुरे, प्राजक्ता कदम, दिव्या नगरकर, सुमन घरड, मयूर कांबळे, लतेश शिगवण सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.