मालवण | सुयोग पंडित ( मुख्य संपादक ) : बारसू रिफायनरीबाबत मनसेची सविस्तर भूमिका ६ मे रोजी रत्नागिरीत होणार्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे स्पष्ट करणार आहेत. ही माहिती मनसेचे ज्येष्ठ नेते श्री.नितीन सरदेसाई यांनी दिल्यानंतर या सध्याच्या संपूर्ण राजकीय, पर्यावरणवादी, विकासाचे ध्येयवादी व सारासार सामाजिक अशा सर्व विचारांसाठी मनसे अध्यक्ष श्री.राज ठाकरे यांची भूमिका ही कोकणसाठी शाश्वत ठरू शकते असा काही तटस्थ राजकीय तज्ञांचा अंदाज आहे.
कोकणातील राजापूरमधील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून राजकीय वातावरण तापले आहे. एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप होत आहेत. विरोधकांनी यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.बारसूचे आंदोलन चिघळल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मनसेने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. कोकणात अशा प्रकारचे प्रकल्प येत असताना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. मात्र, असे असले तरीही येथील स्थानिकांना संपूर्णपणे विश्वासात घेऊन आणि त्यांच्यांशी चर्चा करून प्रकल्प आणले पाहिजे. कोकणात आज रोजगाराच्या संधी खूपच कमी उपलब्ध आहेत. त्यामुळे कोकणातील बरीचशी घरे आज रिकामी दिसतात. कारण येथील तरुण रोजगाराच्या शोधात मुंबईत येतात असेही नितीन सरदेसाई म्हणाले. कोकणात पर्यटन आणि येथे पिकणाऱ्या काजू आणि आंब्यासारख्या पिकांवर प्रक्रिया करणारे प्रकल्प कोकणात आले पाहिजेत असे ते म्हणाले.
मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांचा दृष्टीकोन का महत्वाचा ठरू शकतो यांवर थोडा विचार केला तर एक लक्षात येईल की मनसे या पक्षाची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत बाकी अनेक राजकीय फाटाफूट, विचार धारेतील बदल घडत असताना श्री. राज ठाकरे यांनी रोजगार व पर्यावरण या दोन गोष्टींवर जोर देत मनसेची एक ठोस भूमिका कधीच बदलली नाही आहे. नाशिकला सत्ता प्राप्तीनंतर तिथले बदलही जनतेने अनुभवले परंतु कालांतराने संख्येच्या राजकारणात मनसे स्थीर होऊ शकली नव्हती तरिही मनसेने पर्यावरण व रोजगार विषयक भूमिका बदललेली नाही…अगदी आजपर्यंत. अगदी अलिकडच्या काळात ‘मनविसे’ च्या नवीन फळीने हाती घेतलेले छोटे छोटे सामाजिक प्रकल्प सुद्धा कुठेतरी राजकीय ईर्षेपेक्षा ‘काहीतरी सामाजिक करायचंय’ असा बोलका संदेश देतात हे कित्येक विरोधकही न बोलता मान्य करत असतीलच.
मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांनी स्थानिक कृषी,बागायती,मत्स्य व पशू-पक्षी पालन आधारीत प्रकल्पांकडे त्यांचा दिशा निर्देश केलेला आहे हे श्री. नितीन सरदेसाई यांच्या माहिती वरुन स्पष्ट होते. ‘स्थानिक लोकांना काय हवे आहे व त्यानुसार प्रकल्पांची आखणी व अंमलबजावणी’ हा मनसेचा पहिल्यापासूनच दृष्टीकोन आहे परंतु आजची राजकीय स्थिती व रोज बदलती राजकीय समीकरणे, स्थानिकांची इच्छा यांची योग्य सांगड घालून श्री.राज ठाकरे हे अभ्यासपूर्ण भूमिका मांडतीलच अशी तटस्थ राजकीय तज्ञांना खात्री आहे.
आंदोलने,मोर्चा याही पुढे जात सध्या मनसे काम करते असे मनसेचे तळागाळातील कार्यकर्ते,पदाधिकारी गेली काही वर्षे सिद्ध करत आलेत. ग्रामपंचायत स्तरावर मनसेच्या जागांची संख्या सुद्धा वाढली असल्याचे लक्षात येते आणि ग्रामपंचायत स्तर हाच खरा देशाचा सर्वात शुद्ध ‘स्थानिक स्तर’ असल्याने मनसेची भूमिका ही रिफायनरीबाबतच्या दृष्टीकोनाची बिजं ठरू शकते.
त्यामुळे ६ मे रोजीच्या मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या रत्नागिरीच्या सभेची कोकणवासिय आणि राजकीय विश्लेषकांना नक्कीच ‘शाश्वत आधाराच्या दृष्टीकोनाची’ उत्कंठा असेल. रिफायनरीशिवायही विकास होऊ शकत असेल किंवा रिफायनरीशिवाय विकास व रोजगार शक्यच नाही अशा दोन्ही विचारधारांसाठी ‘६ मे ‘ ची सभा ही राजकीय सभेपेक्षा सामाजिक कार्यशाळा ठरेल का हे ही पहाणे महत्वाचे ठरेल.