सिनेपट | सुयोग पंडित ( मुख्य संपादक ) : महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेतील २७८ व्या भागातील एका स्कीट मधली ही एक ‘जीवन कथा..!’
साधारण ३५ वर्षांचा एक माणुस छानपैकी नुकताच झोपी गेलेला असतो. सकाळी ऑफिसात वेळेवर पोचायला हवं म्हणून झोप अत्यावश्यक इतक्यात त्याचे वडिल एक ग्रिटींग कार्ड घेऊन धावत पळत येत त्याला उठवतात. वडिलांना त्या ग्रिटींग कार्डवर शुभेच्छा संदेश लिहायचा असतो पण त्यांचे हात वयोमानानुसार थरथरत असल्याने ते लिहू शकत नसतात. मुलगा थोडा वैतागत, चरफडत उठतो आणि मजकूर लिहायला सुरुवात करतो.
खरंतर ते ग्रिटींग त्याच मुलासाठी असतं…त्याच्या वाढदिवसानिमित्त वडिलांकडून शुभेच्छापत्र म्हणून..!
पण तरिही ते ‘सरप्राईज’ असंच वाटलं पाहिजे ही वडिलांची इच्छा..तळमळ…माया..! आणि ते देतानाचा व्हिडीओ वडिलांना त्यांच्या ‘अमरपट्टा’ या समवयस्क मित्रांच्या गृपवर शेअर करायचा असतो. तो व्हिडीओ चित्रीत करताना ‘वडिल आणि मुलाची’ जी काही अनोखी केमिस्ट्री आहे ती अभिनयापल्याडची दोन ‘सर्वोच्च माणसे’ किंवा ‘जोडी कलेच्या कमालीची’ …अर्थातच समीर चौघुले आणि प्रसाद खांडेकर हेच या स्कीटला न्याय देऊ शकतात.
दोघेही जाणीव लेखक, अभिनेते, निखळ विनोदवीर ,संपूर्ण सुसंस्कृत माणसं..!
काय व किती अचाट् संकल्पना! वय झालेल्या वडिलांसाठी मध्यम वयीन, अंगाने ‘वडासारखा’ वाढलेला मुलगाही बाळच असतं आणि त्या मध्यम वयीन माणसाला वयस्कर वडिल भार न वाटता त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपावं आणि त्यांच्या पाठीवरुन ‘कापूस घ्या कापूस’ असं शिशुवयीन जगत रहावंसं वाटतं..अगदी आजन्म..!
या स्कीटचे लेखन स्वतः समीर चौघुले यांनीच केलंय. या स्कीटनंतर अभिनेते अंकुश चौधरी यांची प्रतिक्रीया अवश्य पहा..!
तसंही प्रत्येक बाळाला आपल्या वडिलांकडे ‘अमरपट्टा’ आहे असंच वाटत असतं….अगदी ते या जगातून गेले तरिही..! समीर चौघुले आणि प्रसाद खांडेकर या दोन्ही कला व जीवन विचार सशक्त’बाप’ माणसांना सलाम.