आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल | सिनेपट ( सुयोग पंडित | मुख्य संपादक ) : अमेरीकेत संशोधक तथा शास्त्रज्ञ असलेला हुशार मोहन भार्गव भारतात काही कर्तव्यांसाठी त्याच्या गावी येतो. काही दिवस तो बालपण जगतो ,रमतो पण त्याच्या डोक्यातल्या अमेरीकेला जराही भावनीक न होऊ देता तो पुनश्च अमेरिकेकडे जायला निघतो. दरम्यान त्याची बालमैत्रीण गीता ऊर्फ ‘गितली’ ही त्याच्या इतकीच हुशार असून त्याच कर्मठ परंतु दुर्गम गांवात शिक्षिका म्हणून कार्यरत असते तिचाही काहीकाळ सहवास तिला लाभतो. या दरम्यान गांवातील विविध समस्या किंवा अत्यावश्यक सोयी सुविधांसाठी संशोधक मोहन भार्गव काहीतरी करु शकतो असा एक विश्वास गीताच्या मनात रुजू लागतो पण तो रुजून अंकुरण्या आधीच मोहन भार्गव त्याची भाड्याच डि.सी. व्हॅन म्हणजे ट्रेलर घेऊन पुनश्च गांवाला टाटा करुन अमेरिकेला जायला निघतो. काही अंतर गेल्यावर तिथे गीता त्याला भेटते आणि त्याच्या हातात एक छोटी पेटी ठेवते जिच्या छोट्या खणांमध्ये भारतातील विविध राज्यांची ‘माती’ असते. अक्षरशः विविध रंगी माती ….एकीचा रंग दुसरीला नाही किंवा एकिचा गुणधर्म दुसरीला नाही तरिही ती ‘स्वदेसी’ माती असते आणि आपल्या स्वदेसची कधी आठवण आलीच तर ती पेटी उघडून बघायचा एक सुसंस्कृत सल्लाही गीता ,मोहनला देते. प्रत्येक मातीचे महत्व समजावताना गीतामधली शिक्षिका,मोहनची बालमैत्रीण, दुर्गम भागाच्या प्रगतीची अपेक्षा ठेवलेली सुजाण नागरीक आणि अबोल तरिही निःस्वार्थी प्रेयसी ही या प्रसंगातली ख़ासीयत आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या सिनेमात मोहन भार्गव याची भूमिका केलीय ती शाहरुख़ ख़ान याने आणि ती गीता ऊर्फ गितली ‘मातीच्या वेदांनी’ रंगवली आहे ती अभिनेत्री म्हणजे गायत्री जोशी…!
गायत्री जोशी या अभिनेत्री शिवाय स्वदेसची ‘गीता ऊर्फ गितली’ ही भूमिका कोणालाच शक्य नव्हती हे तो सिनेमा पाहिलेला प्रत्येकजण सांगू शकतो म्हणूनच कदाचित् गायत्रीने देखिल ‘स्वदेस’ हा एकच सिनेमा केला असावा…! ‘एखाद्या अमूक एका कामासाठीच आपण नेमले गेलो आहोत आणि आता ते काम संपले किंवा मिशन इज ओव्हर’ असेच काहीसे झाल्यासारखे गायत्रीने पुन्हा कुठलाही सिनेमा केला नाही. ती ‘अतीशय’ गुणी अभिनेत्री सोबतच किती जाणिवेची माणुस असेल याचा अंदाज गीता या शिक्षिकेच्या भूमिकेतून येतो. २०१९ साली एकदा शाहरुख़ने झी टी.व्ही.ला दिलेल्या एका छोट्या मुलाखतीत सांगितले होते की त्याने अनेक सिनेमा केले परंतु ‘स्वदेस’च्या गितली ऊर्फ गीताच्या मागची जी अभिनेत्री आहे त्या गायत्री जोशी सारखी तत्कालीन कमी वयात देखील खरी सुसंस्कृत,सुसंगत आणि तरिही स्वदेस प्रकल्पा दरम्यान संपूर्ण व्यावसायिक पद्धतीने काम केलेला एकही अभिनेता किंवा अभिनेत्री त्याने पाहिली नव्हती.
स्वदेस सिनेमापूर्वी गायत्री ही एक माॅडेल, व्हिडिओ जाॅकी म्हणून कार्यरत होती. तिथेही तिचा वावर हा कधीही झगमगत्या दुनियेत बेछूट नव्हता. नागपूरच्या माऊंट कार्मेल हायस्कूलमध्ये आणि नंतर मुंबईतील जे.बी.वच्छा हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर तीने सिडनहॅम काॅलेजला महाविद्यालयीन शिक्षण घेतले. शाहरुख़ सोबतच ती ‘ह्युन्डाई’ कारच्या जाहीरातीत दिसली तशीच ती एल.जी, गोदरेज, पाॅन्डस् किंवा सनसिल्क सारख्या उत्पादनांच्या जाहिरातीतही उठून दिसली. नंतर पुन्हा तिने वाणिज्य पदवी शिक्षणासाठी सिडनहॅम काॅलेजला जायचे ठरवले.
१९९९ सालच्या फेमीना मिस इंडियाच्या अंतिम पाच जणींत ती होती. नंतर २००० साली तिला ‘मिस इंडिया इंटरनॅशनलचा’ मुकुट मिळाला आणि तीने जपानमधील ‘मिस इंटरनॅशनल २०००’ साठी भारताचे प्रतिनिधीत्व केले. दरम्यान काही इतर माॅडेलींग प्रकल्पही ती करत होती.
आता गायत्री बद्दलची एक जबरदस्त गंमत आहे ती म्हणजे तिने जो एकमेव सिनेमा केला त्यासाठी तिला तब्बल ४ सर्वोच्च सिनेमा पुरस्कार मिळाले आहेत.
सर्वोत्तम पदार्पणासाठी अनुक्रमे बाॅलीवुड मूव्ही पुरस्कार, स्टार स्क्रीन पुरस्कार, झी सिने पुरस्कार आणि ग्लोबल इंडियन फिल्म पुरस्कार…!
आज गायत्री जोशी कुठे असते ते सामान्य सिनेमा रसिक किंवा तिचे सात्विक चाहते खरेच जाणत नसतील. जेंव्हा तिने स्वदेस केलेला आणि नंतर तिचा विवाह झालेला तो काळ वृत्तपत्रे, सिने नियतकालिके किंवा फार फार तर वृत्त वाहिन्यांचाच होता कारण त्या काळी आजचा सोशल मिडिया नव्हता. पण तरिही खात्री आहे की तो असता तरिही ‘गायत्री जोशी’ ही गायत्री जोशीसारखीच सुसंस्कृत असणार होती.
‘गायत्री’ शब्दांचा अर्थ होतो वेदांची देवी. जीवनातील वृत्तींचे,कर्माचे,जाणिवांचे आणि कर्तव्यांच्या आखणीचे शिक्षण आणि त्यांचे कप्पे शिकवणारे तत्व म्हणजे ‘वेद..!’ गायत्री जोशी ही सुद्धा जीवनाचा प्रत्येक कप्पा जाणत असावी कदाचित्…!
नुकताच २० मार्चला गायत्रीचा वाढदिवस झाला. तिला तिच्या संपूर्ण जीवनासाठी आपली ‘सिंधुनगरी न्यूज चॅनेल समूह व सिनेपट’ तर्फे वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा.
स्वदेसच्या गीताची भूमिका जगताना गायत्रीने जी ‘मातीची पेटी’ दिलेला प्रसंग आहे तो प्रसंग देशभक्तीचे,जाणिवांचे आणि अभिनयाचेही विद्यापीठ आहे..!
चाहता म्हणून नेहमी वाटत राहीलच की ‘स्वदेस’ सारखा आणखीन एखादा प्रकल्प आला तर ती वेदांची देवी पुन्हा पडद्यावर अवतरेल का….?
सुयोग पंडित | मुख्य संपादक ( आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल )