दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीने धम्मजागृती अभियान.
मसुरे | प्रतिनिधी : ‘धम्म’ म्हणजे माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे, अर्थात परस्परांशी माणुसकीचे आणि बंधुभावाचे नाते निर्माण करणे. त्यामुळे मानवी संघर्षाला, कलहाला आळा बसेल, एकमेकांशी सलोखा निर्माण होईल. असाच सद्धम्म प्रत्येकाला जीवन जगण्याची ऊर्जा देतो. सद्धधम्माची ही शिकवण हजारो वर्षांपूर्वी तथागत गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला देऊन स्वातंत्र्य, समता, बंधुता,न्याय आणि करुणेचा मार्ग दाखविला. तथागतांच्या या सद्धधम्माचे प्रतिबिंब बोधिसत्व विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात उमटवून सारा भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न साकार केले. संविधानातील या नैतिक मूल्यांचे आचरण करणे म्हणजेच सद्धधम्म होय असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, व्याख्याते प्रा.डाॅ.अमर कांबळे यांनी केले,
दर्पण प्रबोधिनी, सिंधुदुर्ग या संस्थेने आयोजित केलेल्या धम्मजागृती अभियानांतर्गत एका धम्मप्रबोधन प्रसंगी सद्धधम्माची समकालीन प्रस्तुती या विषयावर ते बोलत होते.
प्रा.डाॅ.कांबळे पुढे म्हणाले की,
ज्या व्यक्तीला संविधानाने बहाल केलेल्या न्याय, समता, बंधूभाव, स्वातंत्र्य या मूल्यांची जाण आहे आणि जो भवतालच्या बदलांवर विश्वास ठेवतो, वैचारिक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कदर करता येते त्या व्यक्तीला बुद्ध आणि त्याचा धम्म आपलासा वाटतो. तथागत गौतम बुद्धांनी सक्तीने नाही तर मनपरिवर्तन करून आपल्या धम्माचा प्रसार आणि प्रचार केला. जगात सर्व गोष्टी बदलणाऱ्या म्हणजेच अनित्य आहेत, त्यामुळे आपल्या तत्वज्ञानात, त्याच्या मूळ गाभ्याला धक्का न लागता कालानुरुप बदल करता येईल इतकी लवचिकता तथागतांनी ठेवली. आणि ‘केवळ मी सांगतो’ तेवढेच आणि तेच ऐका आणि आंधळेपणाने माझ्या उपदेशाचे पालन करा, असे न सांगता, माझा उपदेशही तर्काच्या, काळाच्या आणि व्यावहारिकतेच्या कसोटीवर घासून मगच आचरणात आणा. मी कोणी मोक्षदाता नाही.तर केवळ मार्गदाता आहे. असा मौलिक संदेश देऊन सर्व जगालासद्धधम्माचा मार्ग सांगितला. तथागत गौतम बुद्धाच्या या सद्धधम्माचे शुद्ध पालन करावे, आणि भाकरीपेक्षा स्वाभिमानाला जपावे अशी साध्या सोप्या भाषेत बौद्धधम्माची यथार्थ मांडणी त्यांंनी केली.
यावेळी विचारमंचावर संस्थेचे अध्यक्ष आनंद तांबे, माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ निवेदक,कवी राजेश कदम,संस्थेचे उपाध्यक्ष नरेंद्र तांबे, शिवडाव बौद्ध विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष सचिन तांबे, ग्रामीण शाखेचे अध्यक्ष तारक तांबे, प्रा.डाॅ.अमोल कांबळे ,अजितकुमार देठे, दर्पण महिला फ्रंट अध्यक्षा स्नेहल तांबे, उपाध्यक्षा संजना तांबे, ज्येष्ठ सल्लागार भास्कर तांबे गुरुजी,कवी प्रा.सिद्धार्थ तांबे, दर्पण प्रबोधिनीचे सर्व पदाधिकारी,सदस्य, आंबेेडकरी कार्यकर्ते, शिवडाव बौद्ध विकास मंडळाचे सर्व सदस्य, रमाई महिला मंडळ सदस्य आणि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष आनंद तांबे म्हणाले, येणाऱ्या पुढील काळात आपण सजग राहून ही धम्मचळवळ अधिक गतिमान करण्याची गरज आहे असे विचार व्यक्त केले, यावेळी राजेश कदम, सचिन तांबे यांनीही धम्मप्रबोधन चळवळीची आवश्यकता आपल्या मनोगतातून मांडणी केली.
धम्मप्रबोधनाची सुरुवात शिवडाव बौद्ध विकास मंडळाचे बालगायकवृंद यांनी सादर केलेल्या क्रांतीगीताने झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन संदेश तांबे यांनी केले. धम्मप्रबोधनाचे प्रास्ताविक आणि समारोप संस्थेचे सचिव प्रा. सुभाष कदम यांनी केले.