सुयोग पंडित | मुख्य संपादक : गोव्यातील म्हापसा टॅक्सी स्टॅंड परिसरातल्या एका फुटपाथवरची ९ मार्चची रात्र..! फुटपाथवर एक व्यक्ती लवंडलेल्या स्थितीत. प्रथम दर्शनी सरळ सरळ कोणीतरी दारुडा जरा जास्ती झाल्यानंतर फुटपाथवर पसरतो तसाच ‘तो’ पसरला असणार असाच सर्वांचा अंदाज.
काहीवेळ गेल्यानंतर समजते की तो फुटपाथवर ‘पसरलेला’ अट्टल माणुस खरेच भयानक ‘अट्टल’ आहे….पण माणुसकीसाठी. माणसाच्या थेट आधारासाठी आणि निराधाराच्या सुरक्षिततेसाठी.
सडक से उठाकर स्टार बनवणारे खूप असतीलही पंरतु ते स्टारडम टिकवण्याची जबाबदारी कोणी घेत नसतो पण तिथेच तो माणुसकीसाठी पसरलेला तो ‘अट्टल’ माणुस सुपरस्टार ठरतो.
‘जीवन आनंद’ संस्थेचे संदीप परब…!
म्हापसा टॅक्सी स्टॅंड परिसरातल्या फुटपाथवर झोपणार्या बंधु भगिनींच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्वतः संदीप परब यांनी ९ मार्चच्या रात्री तिथे जाऊन…तसेच झोपून कोणाला खर्या आधाराची गरज आहे याची कृती पहाणी केली. या दरम्यान मजना बी नावाच्या ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेला तो आधार हवा आहे हे त्यांना कळले आणि नंतर म्हापसा पोलिसांच्या सहकार्याने त्यांनी मजना बी यांना यापुढील सुरक्षित जीवन आनंदासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘संविता आश्रम’ मध्ये आणायची प्रक्रीया पूर्ण केली.
या मध्ये त्यांना त्यांचे सहकारी प्रसाद आंगणे, साईदास कांबळे आणि जान्हवी मिठबांवकर यांची साथ लाभली. आता या पुढे मजना बी या ‘सुरक्षित जीवन आनंद’ घेतील.
अशा या माणुसकीच्या ‘अट्टल सुपरस्टारची’ माणसांना आधार द्यायची ही पहिलीच खेप नाही परंतु ज्या पद्धतीने हा आधार दिलाय त्यासारखी माणुस म्हणून दुसरी ‘झेप’ नाही.