बांदा | राकेश परब : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सन २०२२-२३या शैक्षणिक वर्षासाठीच्या नवोपक्रम स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील बांदा नं.१ केंद्रशाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री जे.डी.पाटील यांच्या नवोपक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरा क्रमांक प्राप्त झाला असून या नवोपक्रमाची राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.जे.डी.पाटील यांच्या नवोपक्रमाची बांदा केंद्र शाळेतून सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाल्याबद्दल यशाची हॅटट्रिक साधली आहे या यशामुळे उपक्रमशील व सर्वाधिक पटसंख्या असलेल्या शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दरवर्षी उपक्रमशील शिक्षकांना प्रोत्साहन मिळाले यासाठी प्राथमिक,माध्यमिक, अंगणवाडी सेविका व अधिकारी वर्ग यांच्या साठी ही नवोपक्रम स्पर्धा राज्यस्तराहून आयोजित करण्यात येते.या स्पर्धेत राज्यभरातून शेकडो शिक्षक सहभागी होत असतात.
पाटील यांनी चालू वर्षी ‘आनंददायी सुरुवात, पहिलीच्या शिक्षणाची’ या नवोपक्रमाचे सादरीकरण केले होते. गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वप्राथमिक म्हणजेच अंगणवाडी व बालवाडीचे शिक्षण पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांचा पहिलीमधील प्रवेश सहज व आनंददायी व्हावा, यासाठी विविध खेळावर आधारित शैक्षणिक अनुभूती तसेच पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यासाठी विविध उपक्रमांची यशस्वीपणे अमंलबजावणी केली होती.
पाटील यांनी मिळवलेल्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश मोरजकर, मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, केंद्र प्रमुख संदीप गवस , विस्तार अधिकारी दुर्वा साळगांवकर गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके व शाळेतील सहकारी शिक्षक यांनी अभिनंदन केले असून या नवोपक्रमासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख,डाएटच्या प्राचार्या ए.पी.तवशीकर, डाएटचे अधिव्याख्याता व संशोधन विभाग प्रमुख डॉ. लवू आचरेकर यांचे मार्गदर्शन लाभले.