मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्हा ते राज्यस्तर असा गेल्या पाच वर्षांमध्ये नियमीत समाज सकारात्मक विहार करणारे कणकवलीतील एक नांव म्हणजे कवयित्री तथा साहित्यिक सरिता पवार.
सदाशीव पवार गुरुजी प्रतिष्ठान हा गेल्या दोन वर्षांतील त्यांचा एक कौटुंबिक सामाजीक गौरव करायचा प्रकल्प सर्वश्रृत आहेच परंतु त्या सोबत समांतर अशी एक सर्वांगीण प्रगतीची आस धरणारी अभ्यास धारा म्हणून सरिता पवार एक आधुनीक युवा आदर्श म्हणता येतील.
क्रांती ज्योती पुरस्कारांची मशाल ही केवळ ग्लॅमर नसते तर ती खरोखरची ह्रदयापासून ज्वलंत राखावी लागणारी कार्यरततेची ज्योत असते हे सरिता पवार यांनी शैक्षणिक,साहीत्य व सामाजिक क्षेत्रातून योगदान देत सिद्ध केलेले आहे.
आता सरिता पवार यांच्या ‘निज़खुणेत’ एक पहिले ‘तिचे असे’ काहीतरी नवीन जन्माला येत आहे.
‘राखायला हवी निजखूण’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह किंवा पहिले पुस्तक किंवा या सरितेचा पहिला ‘घाट’ घातला गेला आहे. प्रत्येक कवितेला गंगेची उपमा दिली जाते…ती धार्मिक असो किंवा तात्विक असो गंगेच्या नैसर्गिक प्रवाहासारखीच कविता असते. त्यामुळे सरितेच्या साहीत्य धारेचा हा पहिला महत्वाचा ‘घाट’ आहे. राजगृह प्रकाशन, कोल्हापूर हे या कविता संग्रहाचे प्रकाशक असून मिळून सार्याजणी या अंकाच्या संपादिका गीताली वि.म. या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्ष आहेत.ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डाॅ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते सरितेच्या या पहिल्या ‘घाटाचे’ म्हणजे कवितासंग्रहाचे प्रकाशन होईल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ कवयित्री उषा परब,प्रा.डाॅ.संदीप सांगळे,कवी डाॅ. विशाल इंगोले हे मान्यवर देखील प्रकाशन सोहळ्यातील प्रमुख अतिथी तथा यांचे हात प्रकाशनाला लाभणार आहेत हे विशेष.
राजगृह प्रकाशन व अद्वैत फाऊंडेशन हे कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतल्या कणकवली काॅलेजमधील एच.पी.सी.एल.सभागृहात हा सोहळा ७ जानेवारीला दुपारी ३:३० वाजता संपन्न होणार आहे.
कवयित्री सरिता पवार यांचा ‘राखायला हवी निजखूण’ या पहिल्या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा हा नुसताच एका पुस्तकाचा नक्कीच नसेल तर तो एक शैक्षणिक,सामाजिक व वैचारीक कार्यशाळेचाच एक भाग असेल.
तर ७ जानेवारीची ‘निज खूणगाठ’ राखून ठेवून त्या सोहळ्याचे सर्वांनीच अवश्य साक्षीदार बनावे…सरितेच्या पहिल्या ‘घाटाचे’ साहित्यरसिक,शिक्षणप्रेमी व समाज विचारक वृत्तींनी थाटाने स्वागत करुन हा सोहळा मनभरुन साजरा करावा या संपूर्ण आपली सिंधुनगरी चॅनल समूहातर्फे सदिच्छा .