बांदा | राकेश परब : पाडलोस-केणीवाडा अंतर्गत रस्त्याची झालेली दुरावस्था वाहतुकीस जीवावर बेतणारी आहे. प्रवासी, शालेय विद्यार्थ्यांसह रुग्णांना रस्त्यावरून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागते. याकडे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले असता त्यांनी पावसाळ्यापूर्वी सदर रस्ता निर्धोक करण्यात येणार असे आश्वासन दिल्याचे भाजप युवा मोर्चा सरचिटणीस तथा नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्य काका परब यांनी सांगितले.
राम मंदिर मार्गे वाडीत जाणाऱ्या रस्त्यावर अनेक अपघात झालेत. संपूर्ण खडी उखडून रस्ताच गायब होण्याच्या स्थितीत आहे. रुग्णांना ने-आण करताना तसेच प्रवाशांना देखील ये-जा करताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. संपूर्ण मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण होण्यासाठी मोठ्या निधीची गरज असल्याने याकडे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावेळी पावसाळ्यापूर्वी सदर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण होणार असल्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्याचे काका परब यांनी सांगितले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक महेश सारंग आदी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांकनी दिलेल्या शब्दामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात कधी होणार याकडेही केणीवाडा वासीयांचे लक्ष लागले आहे.