बांदा | राकेश परब : इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे डिसेंबर मध्ये इचलकरंजी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या दुसऱ्या साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठी साहित्यातील नामवंत कवी आणि समीक्षक प्राचार्य डॉ गोविंद काजरेकर (सावंतवाडी) यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष महावीर कांबळे यांनी दिली.
महावीर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली इचलकरंजी येथे संस्थेची वार्षिक सभा आयोजित करण्यात आली.यावेळी साहित्य संस्कृती संमेलन २०२२ च्या अध्यक्षांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी अनुराधा काळे, पंडित कांबळे, संजय रेंदाळकर, सुनील कोकणी, दत्तात्रय लाळगे-पाटील, विभावरी कांबळे आदी उपस्थित होते.
संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. काजरेकर हे नव्वदोत्तर मराठी कवितेतील महत्त्वाचे कवी मानले जात असून त्यांना राज्य शासनाचा बहिणाबाई पुरस्कार, विशाखा पुरस्कार आदी प्रतिष्ठित पुरस्कारांबरोबरच अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नववी- दहावी आणि अकरावी – बारावी या अभ्यास निवड मंडळाबरोबरच मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास निवड मंडळावर त्यांनी काम केले आहे. त्यांचा “राजन गवस यांचे कथात्मक साहित्य” हा महत्वाचा समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध असून अन्य समीक्षा लेखनाचाही एक ग्रंथ प्रसिद्ध आहे. आजवर त्यांनी अनेक राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये निबंध वाचन केले आहे. ‘नवक्षर दर्शनचे’ विद्यमान संपादक म्हणूनही ते कार्यरत आहेत.
संमेलनाच्या अधिक माहितीसाठी संपर्क पंडित कांबळे ९१४६१०६६७८ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.