मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातील ऐतिहासिक दांडीच्या समुद्र किनाऱ्यावर हिंदुस्थानच्या आरमाराचे जनक छत्रपती श्री. शिवाजी महाराजांनी दिनांक २५ नोव्हेंबर १६६४ रोजी मोरयाचा धोंडा या पाषाणावर सिंधुदुर्ग किल्ल्याचे भूमीपूजन केले होते. दरवर्षी दिनांक २५ नोव्हेंबरला प्रेरणोत्सव समितीमार्फत हा पवित्र पावन दिन साजरा केला जातो. ‘मोरया दिन’ असे याचे संबोधन केले जाते.
या दिवसाला व या श्रद्धा स्थानाला गतवैभव प्राप्त व्हावे म्हणून समिती गेली अनेक वर्षे प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून आता ‘मोरयाच्या धोंडा आणि परिसराचा’ शासनाच्या नावे स्वतंत्र सातबारा तयार झाला आहे. समस्त महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असलेल्या महाराजांनी वसवलेल्या या पवित्र स्मृतीला मानवंदना देण्यासाठी उद्या दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजता मोरयाचा धोंडा, वायरी-दांडी समुद्र किनारी उपस्थित रहावे असे आवाहन तथा निमंत्रण किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीतर्फे देण्यात आले आहे.