सिनेपट | वाढदिवस विशेष : २०११ साली ‘प्यार का पंचनामा’ नावाचा एक सिनेमा आलेला जो तत्कालीन युवा पिढीला खूप भावलेला. त्या सिनेमात कोणतीही प्रतिथयश नावे नव्हती परंतु आज अकरा वर्षांनंतर त्यातील एक नांव अव्वल तथा प्रतिथयश आहे ते म्हणजे अभिनेता कार्तिक तिवारी ऊर्फ कार्तिक आर्यन.

२२ नोव्हेंबर १९८८ साली ग्वाल्हेर मध्ये डाॅ. माला तिवारी व डाॅ.मनीष तिवारी यांच्या पोटी जन्माला आलेला कार्तिक किंवा त्याच्या कुटुंबातील आणखी कोणीही सिनेमा जगताशी संबंधीत नव्हते. आई माला ही स्त्री रोग तज्ञ आणि वडिल मनीष हे बालरोग तज्ञ अशा डाॅक्टर दांपत्याला कार्तिककडूनही डाॅक्टरकीचीच अपेक्षा होती..पण ते अती आग्रही नव्हते. कार्तिक अभ्यासात अतिशय उत्तम असल्याने तो शैक्षणिक बळावर काहीतरी चांगले नक्कीच करेल ही त्यांना खात्री होती.

११ वी नंतर कार्तिकला अभिनेता बनण्याची इच्छा होऊ लागली. त्यासाठी त्याने मुंबईला पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या डि.वाय.पाटील काॅलेजात बायोटेक्नाॅलाॅजी मध्ये बी.टेक. करता करता त्याने मुंबईत विविध ठिकाणी ऑडिशन्स द्यायचा सपाटा सुरु केला. प्रसंगी काॅलेजला दांडी मारून तो ऑडिशन्स देत राहीला परंतु अभ्यासातील प्रगतीवर त्याचा परीणाम नसल्याने त्याच्या पालकांना त्याचा फारसा त्रास होत नव्हता. सुरवातीला थेट अभिनेता काही तो बने शकला नाही परंतु आकर्षक व्यक्तिमत्वामुळे त्याला माॅडेलींग जगात प्रवेश मिळाला. इथेच त्या च्या अभिनेता बनायच्या स्वप्नाला आणखीन ऊर्जा लाभली.

२०११ च्या प्यार का पंचनामा मधील त्याचा ५:३० मिनिटाचा सलग एकपात्री आभिनय तसेच २०१५ च्या प्यार का पंचनामा २ मधील ७:३० मिनिटाचा सलग एकपात्री आभिनय पाहिल्यानंतर कार्तिक आर्यन हा कोणत्या स्तराचा सहज अभिनेता आहे त्याचा अंदाज प्रेक्षकांना येईल. मध्ये आलेला आकाशवाणी नावाचा एक सिनेमा तसा ठीकठाक होता परंतु २०१८ साली आलेल्या ‘सोनू के टिट्टूकी स्वीटी ‘ या जबरदस्त सिनेमानंतर कार्तिक आर्यन हा संपूर्ण सिनेमा सृष्टीतील हुकुमी एक्क्यांपैकी एक बनून गेला. पुढे त्याची कारकीर्द बहरत जातेय ती आजपर्यंत.
कै.सुशांत सिंग राजपुत नंतर जर ‘सेल्फ मेड यशस्वी’ अभिनेता म्हणून आदराने ज्याचे नांव घेतले जाते ते कार्तिकचेच.
मध्यंतरी कार्तिकच्या आईला कॅन्सरने गाठले…त्याने सर्व गोष्टी बाजुला ठेऊन त्याचा ‘व्यावसायिक कमाईचा’ वेळ आईला दिला. मुलाच्या सकारात्मक गुणांनी आईने कॅन्सरवर खूप कमी काळात मात केली. नंतर कार्तिक पुन्हा एकदा दुप्पट जोशात परंतु नम्रपणे सिनेमा जगात वावरु लागला.
संपूर्ण सेल्फ मेड ताकदिच्या या आयर्नमॅन कार्तिक तिवारी ऊर्फ कार्तिक आर्यन याचा आज वाढदिवस. त्याच्या चाहत्यांतर्फे त्याला मनापासून शुभेच्छा येत असतीलच.
आपली सिंधुनगरी चॅनेल व सिनेपट विभागातर्फे कार्तिकला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा.
युवा पिढीसाठी ‘वशिल्याशिवायही कारकिर्द उत्तम घडू शकते’ असा विश्वास देणार्या कार्तिकच्या आई वडिलांचेही विशेष अभिनंदन करावेच लागेल.

सिनेपट | आपली सिंधुनगरी चॅनेल