विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
बिडये विद्यामंदिर केंद्र शाळा आचरा नंबर १ येथे बाल दिन साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. स्मिता जोशी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम सोहळा पार पडला. शाळेतील पदवीधर शिक्षक पांडुरंग कोचरेकर यांनी बालदिनाचे वैशिष्ट्य मुलांना सांगितले. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण निर्मित आणि दत्तात्रय हिर्लेकर गुरुजी (कणकवली) संग्रहित “आईची देणगी” या पुस्तिकेचे वाटप करून 14 माता आणि 14 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मातांच्या वतीने श्रीम. शमा शेख आणि श्रीम. चव्हाण यांनी आभार मानले. मातांनी मुलांच्या छंदांकडे, त्यांच्या विविध गुणदर्शनाकडे लक्ष पुरवले, त्यांना मार्गदर्शन केले तर आपली मुले भारताचे आदर्श नागरिक बनतील असा विश्वास स्मिता जोशी यांनी व्यक्त केला. पांडुरंग कोचरेकर, चंद्रकांत माने यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. यावेळी कु.अश्विनी सचिन मेस्त्री हिचा वाढदिवस समारंभपूर्वक साजरा करण्यात आला. यावेळी संजय जाधव ,अरुण आडे विद्यार्थी, पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. श्री अरुण आडे यांनी आभार मानले तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री पांडुरंग कोचरेकर यांनी केले.