बांदा |राकेश परब :
छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले स्वराज्य टिकवायचे असेल तर अभेद्य किल्ल्याची आवश्यकता होती. स्वराज्याचे स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकर यांनी आपल्या कौशल्याच्या बळावर अत्यंत सुरक्षित व शत्रूला जिंकण्यासाठी कठीण अशा किल्ल्याची बांधणी केली. या किल्ल्याची माहिती आताच्या पिढीला व्हावी यासाठी तरुणांनी मोठ्या संख्येने किल्ले स्पर्धेत सहभाग घेऊन किल्ल्याची महती सर्वदूर पोहचवावी असे आवाहन श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर यांनी येथे केले.
श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित किल्ले स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात श्री. मोरजकर बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे कार्यवाह समीर परब, खजिनदार भूषण सावंत, अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर, नारायण बांदेकर, अनुप बांदेकर, शैलेश केसरकर, गिरीश भोगले आदी उपस्थित होते.
बांदा शहर मर्यादित दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली होती. १५ वर्षाखालील गटात
प्रथम क्रमांक – कु. साईशा आणि कु. प्रज्वल केसरकर (प्रतापगड), द्वितीय क्रमांक – गौरांग भांगले (लोहगड), तृतीय क्रमांक – शंकर आरोलकर (मल्हारगड) तर १५ वर्षावरील गटात प्रथम क्रमांक – श्री गणेश मूर्ती शाळा निमजगा (किल्ले जंजिरा), द्वितीय क्रमांक – गवळीटेम्बवाडी (किल्ले पन्हाळा आणि विशाळगड), तृतीय क्रमांक – मेदिनी परब (किल्ले जंजिरा) यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. विजेत्यांना रोख रक्कम, चषक देण्यात आला. तसेच उद्योजक दत्तप्रसाद पावसकर यांनी दोन्ही गटातील प्रथम क्रमांक विजेत्यांना समई भेट दिली.
प्रस्ताविकात भूषण सावंत यांनी स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्य, शिवविचार तळागाळात पोहचविण्यासाठी भविष्यातील संकल्प याविषयी मनोगत व्यक्त केले.