कणकवली | ब्युरो न्यूज: मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण कणकवली तालुक्यातील सात पुरवणी निवाड्यांची मोबदला रक्कम संबंधितांच्या खाती जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पुरवणी निवाड्यांच्या जमिनीचा ताबा हा महामार्ग प्राधिकरणकडे देण्यात येणार आहे. या सातही पुरवणी निवाड्यांची रक्कम हस्तांतरित केल्याने कणकवली प्रांताधिकारी कार्यालयाकडील पाठवलेले प्रलंबित निवाडे निकाली झाले आहेत. तर नांदगाव सर्व्हिस रस्त्यासाठी सातवा निवाडा निकाली असून ती जागा महामार्ग प्राधिकरणच्या ताब्यात देण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी राजमाने यांनी दिली. आता प्रत्यक्ष कामाला केव्हा सुरु होणार? याकडे नांदगाव पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कणकवलीतील प्रलंबित निवाड्याबाबत गेले काही दिवस चौपदरीकरणात बाधित जमीन मालक मोबदल्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र मिसिंग प्लॉटमुळे या जमिनीचा मोबदला मिळाला नव्हता. मिसिंग प्लॉट आढळल्यानंतर याबाबतची रीतसर अधिसूचना काढून भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली गेली.कालाच्या माध्यमातून हे पुरवणी निवाडे मंजुरी करता भूमी राशी पोर्टल द्वारे संबंधित जमीन पालकांच्या खात्यावर जमा करण्याकरिता पाठवण्यात आले होते. या मोबदला देय असलेल्या पुरवणी निवाड्यांमध्ये वारगाव, जांभळगाव, हुंबरट, जानवली, आनंदनगर, खारेपाटण या पुरवणी निवाड्यांचा समावेश आहे. या पुरवणी निवाड्यांची जागा येत्या आठ दिवसांत महामार्ग प्राधिकरणच्या ताब्यात दिली जाणार आहे. दरम्यान मिसिंग प्लॉट असलेले कणकवली तालुक्यातील कणकवली शहर, वागदे व ओसरगाव येथील ३१ निवाडे हे मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवायचे बाकी आहेत. हे निवाडे लवकरच वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत. कणकवली तालुक्यातील निवाड्यांची मोबदला रक्कम अदा करण्याची प्रक्रिया गेली काही वर्षे सातत्याने सुरु आहे. एक काटेकोरपणे शक्यतो जलद गतीने ही मोबदला रक्कम संबंधित खातेदारांना अदा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे गेले अनेक वर्षे होऊन देखील प्रलंबित असलेले निवाडे निकाली झाल्याचे वैशाली राजमाने यांनी सांगितले. कणकवली तालुक्यातील मुबई गोवा महामार्ग चौपदरीकरण भूसंपादन प्रक्रियेतील मिसिंग प्लॉटचे पुरवणी वाडे पाठवले गेले होते. हे सर्व निवाडे निकाली निघाल्याने कणकवली प्रांताधिकाऱ्यांकडून महामार्ग प्राधिकरणला ताबा पावती दिल्यावर त्यांचा प्रलंबित कामे करण्याचा मार्गी लागणार आहेत. या सात पुरवणी निवाड्यांच्या नोटीसला ६० दिवस उलटून गेलेले असल्याने सदर जमीन महामार्ग प्राधिकरणच्या ताब्यात गेली आहे. याबाबत ताबा पावती देऊन ही देखील प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती वैशाली राजमाने यांनी दिली आहे.