ग्रामस्थांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका : सरपंच सौ उमदी उदय परब
प्रतिनिधी / मसुरे : मालवण ओझर कांदळगाव मसुरे रस्त्यावर कांदळगाव येथे खड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे. आगामी गणेश चतुर्थीचा उत्सव पाहता सदर खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी सरपंच सौ उमदी उदय परब यांनी केली आहे. ग्रामस्थांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.
दरम्यान सदर रस्ता खड्डे पडल्याने धोकादायक बनल्या बाबत मागील महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण कार्यालयाला कांदळगाव ग्रामपंचायतने निवेदनाद्वारे कळविले आहे. अद्यापि कोणतीही उपाय योजना बांधकाम विभागाने न केल्याने वाहन चालक व ग्रामस्थ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
लाडक्या श्री गणरायाचे आगमन चारच दिवसानि होणार आहे. कांदळगाव रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने संपूर्ण रस्ताच खड्यात गेला आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी खाजगी वाहनांनी येणार असल्याने खड्यांमुळे अपघात तसेच वाहने नादुरुस्त होण्याची शक्यता आहे. खराब रस्त्यामुळे गाड्या खिळखिळया झाल्या असून प्रवाशांना शारीरिक नुकसानिस सुद्धा सामोरे जावे लागत आहे. संबंधित विभागाचे वारंवार लक्ष वेधून सुद्धा कांदळगाव रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने सरपंच सौ उमदी उदय परब यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास ग्रामस्थांच्या उद्रेकास अधिकारी वर्गास सामोरे जावे लागेल असा इशारा सरपंच सौ उमदी परब यांनी दिला आहे.